जालना -मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर आंदोलन भोकरदनमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन झाले. निवासस्थानासमोर आज सकाळी १० वाजेपासून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून मराठा समाजाच्या मागण्यांकडे लोक प्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करून समाजाच्या मागण्या आमदारांपर्यंत पोहचवण्यात आल्या.
हेही वाचा -'हाथरसच्या घटनेत उत्तर प्रदेश सरकारची भूमिका घृणास्पद'
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करून आंदोलकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार आणि आमदारांना धारेवर धरले. मराठा समाजाच्या मागण्या तत्काळ पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनानंतर खासदार व आमदारांना मागण्यांचे निवेदनही कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. या वेळी त्र्यंबकराव पाबळे सुरेश तळेकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ चंद्रकांत साबळे, नारायण जिवराग, प्रा. नंदू गिऱ्हे, प्रा. अंकुश जाधव, नानासाहेब वानखेडे, विष्णू गाढे, राहुल देशमुख, आप्पासाहेब जाधव, जंजाळ, विकास जाधव, नारायण लोखंडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा -नाशिकच्या भाजप कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी 'जागरण-गोंधळ'