जालना Manoj Jarange Patil : सर्वपक्षीय बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं अध्यादेश रद्द करावा. सरकारला वेळ द्यायचा की नाही हे सरकारशी बोलून ठरवू. मी चुकीच करणार नाही, मग तुम्ही योग्य करणार का? सरकारला वेळ दिला म्हणजे आरक्षण मिळणार का? गरिबांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वेळ दिल्यावर सरसकट आरक्षण देण्यात येणार का? आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबविणार नाही. वेळ कशासाठी पाहिजे ते सांगा, असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.
मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम : आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे. मी उपोषणाला बसल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी वेळ मागत आहात. आपण आरक्षण कसं देणार हे सांगा. मराठा समाजाचा किती अंत पाहणार आहात. मी चर्चेसाठी बोलावूनही सरकार चर्चेसाठी आलं नाही. फडणवीस यांनी यावं मराठे अडविणार नाहीत. आजपासून मी पाणी प्यायचं सोडणार आहे. शांततेचं युद्ध आता सरकारला पेलवणार नाही. कोणताही पक्ष आपाला नाही. मराठ्यांना राजकीय नेत्यांनी वेड्यात काढल्याचं जरांगे यांनी म्हटलंय.मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे : राज्यातील सर्व पक्ष एकत्र काम करण्यास तयार आहेत. इतर समाजावर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यावर सर्व पक्षांनी एकमत दर्शवलं आहे. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युद्धपातळीवर काम करत आहे, मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजानं संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.