जालना - तालुक्यातील पुणे गावचे ग्रामस्थ कारभारी अंभोरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणसाठी बसले होते. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर अक्षरश: हातपाय बांधून उपचार केले.
जालन्यात उपोषणकर्त्यावर हातपाय बांधून उपचार करण्याची वेळ - karbhari ambhore jalna
तालुक्यातील पुणे गावचे ग्रामस्थ कारभारी अंभोरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणसाठी बसले होते. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर अक्षरश: हात पाय बांधून उपचार केले.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी पाच ऑगस्टपासून अंभोरे उपोषणसाठी बसले होते. याची दखल घेऊन शुक्रवारी (16 ऑगस्ट) संबंधितावर कारवाई देखील झाली. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याचे कारण देऊन अंभोरे यांनी शेवटच्या क्षणी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे हतबल झालेल्या शासकीय यंत्रणेने आज (17 ऑगस्ट) पोलिसांच्या मदतीने अंभोरे यांना शासकीय रुग्णालयात भर्ती केले आहे.
तेथेही या अवखळ उपोषणकर्त्याने उपचार घेण्यास नकार दिला. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना जवळदेखील फिरकू दिले नाही. त्यातच सलाईनची सुई चुकीच्या ठिकाणी लागल्यामुळे थोडा रक्त प्रवाहदेखील झाला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अंभोरे यांच्यावर डॉक्टरांनी हात पाय बांधून उपचार सुरू केला. सलाईनची बाटली पूर्ण संपेपर्यंत त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. दरम्यान, सध्या अंभोरे यांची प्रकृती चांगली असून, देखरेखीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवावे लागेल, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.