जालना : भोकरदन तालुक्यातील विरेगावात एका 32 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला आहे. ही घटना सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. 32 वर्षीय राजू आत्माराम दळवी असं मृत तरुणाचं नाव आहे. तो एका फायनान्स कंपनीत कामाला होता.
रविवारी 11 एप्रिलला रात्री तो बाहेरून जाऊन येतो. असे म्हणून घरच्यांना सांगून घराबाहेर पडला. मात्र, उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे घरच्यांनी व नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी सोमवारी जुई धरण पाटीजवळील चोऱ्हाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत राजू याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर मृतदेह विहीरीबाहेर काढून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी भोकरदन पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.