जालना- आत्तापर्यंत जालना जिल्ह्यांमध्ये 462 नागरिकांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. हे प्रमाण शहरी भागात जास्त आहे. शहरी भागात 312 तर ग्रामीण भागात 150 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये आणि लागण झालेल्यांमध्ये पुरुषांचा आकडा जास्त आहे. दहा पुरुष तर तीन महिलांचा यामध्ये समावेश आहे.
जालन्याला कोरोनाचा विळखा; मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त जालना जिल्ह्याचा आजपर्यंतचा कोरोनाचा आढावा घेतला, तर एप्रिल महिन्यात 3, मेमध्ये 20 आणि जूनमध्ये 366 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये 288 पुरुष तर 174 महिला आहेत. वयोगटानुसार पंधरा वर्षापर्यंत - 57, 15 ते 30 - 133, 31 ते 45 - 150, 46 ते 60 - 87 आणि 61 ते 75 असे 35 रुग्ण आहेत. यापैकी शहरी भागातील 312 आणि ग्रामीण भागातील दीडशे रुग्ण आहेत. मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी मेमध्ये एकाचा, जूनमध्ये 12 रुग्णांचा जीव गेला आहे. त्यामध्ये अंबड तालुका -2 , भोकरदन -1, घनसावंगी -1, जाफराबाद - 1 जालना - 7 आणि परतूर - 1 यांचा समावेश आहे.
सध्य परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्ये 462 पैकी 140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आठ जण गंभीर आहेत. 301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन सरकारी आणि तीन खासगी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीला सहा शासकीय आणि 19 खासगी परिचारिका सेवेत आहेत.
जिल्ह्यामध्ये 119 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यापैकी 82 ठिकाणी हे क्षेत्र मागे घेण्यात आले असून 37 ठिकाणी आजही ही प्रतिबंधित क्षेत्र सुरू आहे. वयोगटानुसार 11 ते 30 ते 45 च्या दरम्यान तरुणांना कोरोनाची जास्त बाधा झाली होती. ही संख्या 150 वर आहे. मात्र हे सर्वजण धोक्याच्या बाहेर आहेत. त्या पुढील वयोगटातील रुग्णाचाच मृत्यू झाला आहे. दिनांक 26 जूनला सर्वात जास्त म्हणजे चाळीस रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत 301 रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त 18 जूनला 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर कोरोना वार्डाचे प्रमुख डॉ. जगताप हे या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.