जालना- लॉकडाऊनच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात देशी-विदेशी दारूच्या चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण चोर पकडल्यानंतर कमी झाले होते. मात्र, आता किरकोळ घरगुती चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी दवा बाजारात तीन दुकान फोडल्यानंतर रविवारी रात्री महात्मा फुले मार्केटमधील पुन्हा तीन दुकानांमध्ये चोरी झाली तर विद्युत कॉलनीतील एका एसटी कर्मचाऱ्यांचे घर फोडून सुमारे 60 हजारांचा ऐवज पळवून नेल्याची घटना घडली.
बसचालकाच्या घरातून साठ हजारांचा ऐवज तर किराणा दुकान फोडून वीस हजारांचा किराणा लंपास
महात्मा फुले बाजारात असलेल्या किराणा दुकानांमधून सुकामेवा आणि तेलाचे डबे असा एकूण सुमारे वीस हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला.
महात्मा फुले बाजारात असलेल्या किराणा दुकानांमधून सुकामेवा आणि तेलाचे डबे असा एकूण सुमारे वीस हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला, तर जुना जालन्यातील विद्युत कॉलनी येथे राहणाऱ्या राजेंद्र कुलकर्णी यांच्या घरातील किरायादार विनोद नानासाहेब देशमुख हे औरंगाबाद एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, सुट्टीमुळे ते जाफराबाद तालुक्यातील तोंडोळी या गावी गेले होते. रविवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कानातील सोन्याच्या बाळ्या ,सोन्याचा गोफ, रिंग, पायातील चेन जोड, जोडवे ,रोख रक्कम, असा एकूण सुमारे 60 हजारांचा माल लंपास केला आहे.
घटनास्थळाची पोलिसांनी, ठसे तज्ञांनी, पाहणी केली आहे. तसेच श्वान पथकालाही पाचारण केले होते. घरापासून काही अंतरापर्यंत श्वान मार्ग दाखवू शकले. घरफोड प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात तर किराणा दुकान फोडल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेतले नाही.