जालना- वीज महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 2011 मध्ये अंबड तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने नियमानुसार, कोटेशन भरून शेतीसाठी विजेची मागणी केली होती. वीज जोडणी तर आत्तापर्यंत मिळालीच नाही, पण महावितरणाने तीस हजारांचे बिल मात्र त्या महिला शेतकरीला पाठवले आहे. महावितरणाचे बिल पाहून त्या महिला शेतकरीला धक्काच बसला.
अंबड तालुक्यातील आलमगाव येथील सविता प्रल्हाद बर्गे यांनी, 16 डिसेंबर 2011 ला शेतीसाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी 4 हजार 750 रुपयांचे कोटेशन वीज मंडळाकडे भरले. अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी करुन मिळालेली नाही. त्यांनी याबाबत वारंवार अंबाड उपविभागात पाठपुरावा केला. तरीदेखील त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. पण वीज मंडळाने 27 जानेवारी 2020 ला सविता यांना वीज बिल पाठवून दिले. हे बिल तब्बल तीस हजाराचे आहे. शेतामध्ये वीज जोडणीच नसताना, तीस हजाराचे बिल आल्याने, सविता यांना धक्काच बसला.
याविषयी वीज वितरण मंडळाचे अंबड येथील अभियंता देवकर यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, '2011 मध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू होती. या योजनेअंतर्गत हे काम होणार होते. मात्र सध्या ती योजना स्थगित आहे. तसेच विद्युत साहित्य नसल्याने, जोडणी देता आली नाही. कोटेशन भरल्यानंतर त्यांच्याकडून सरासरी बिलाची आकारणी करण्यात आली आहे. आता त्यांनी घेतलेल्या पिकाचे उत्पादन आणि तलाठ्यांनी याबाबत सात-बारावर केलेली नोंद, याची तपासणी करून हे बिल रद्द करण्यात येईल.'