जालना - शहरातील पंचमुखी महादेव मंदिराला आज महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी दर सोमवारी गर्दी असतेच. मात्र, आज सोमवार आणि त्यामध्येही महाशिवरात्र या दुग्धशर्करा योगामुळे आज पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांनी पंचमुखीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
पंचमुखी मंदिराला जत्रेचे स्वरूप; दर्शानासाठी भाविकांची गर्दी - पंचमुखी महादेव जालना
शहरात कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले पुरातन पंचमुखी महादेव मंदिर आहे. जालना शहर व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा कारभार विश्वस्थ मार्फत पाहिला जातो. त्यामुळे येथे नित्यनियमाने सकाळी आणि सायंकाळी महाआरती केली जाते.
शहरात कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले पुरातन पंचमुखी महादेव मंदिर आहे. जालना शहर व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा कारभार विश्वस्थ मार्फत पाहिला जातो. त्यामुळे येथे नित्यनियमाने सकाळी आणि सायंकाळी महाआरती केली जाते. तसेच वार्षिक महोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते. आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर गेल्या २ दिवसांपासूनच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कुंडलिकेच्या काठावर असलेले हे मंदिर रात्रीच्या वेळी या विद्युत रोषणाईमध्ये अधिकच आकर्षक दिसत आहे.
मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दानशूर आणि धार्मिक वृत्तीच्या भक्तांकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. सुरक्षिततेच्या कारणावरून येथे चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.