महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसकडून सरप्राईज उमेदवार असलेले राजेश राठोड नेमके आहेत तरी कोण ?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात भाजपकडून चार नावांची घोषणा याआधीच करण्याच आलेली आहे. महाविकासआघाडीने पाच उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होईल, सहा उमेदवार दिल्यास मात्र मतदानाची वेळ येणार आहे.

rajesh rathod
राजेश राठोड

By

Published : May 10, 2020, 9:38 AM IST

जालना - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूका होऊ घातल्या आहेत. संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेसची एक जागा आरामात निवडून येऊ शकते मात्र, काँग्रेस दोन जागांसाठी आग्रही आहे. त्यातही एका जागेवर काँग्रेसमधून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, बसवराज पाटील यांच्यासह अनेकांना मागे टाकत, जालन्यातील काँग्रेसचे युवा नेतृत्व असणारे राजेश राठोड यांनी हि उमेदवारी पटकावली आहे. 'काँग्रेससोबत एकनिष्ठ आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय' यामुळे बंजारा समाजातील राजेश राठोड यांना उमेदवारी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत राजेश राठोड...

हेही वाचा...काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर

विधानसभेतून माघार घेतल्याची भरपाई ?

विधान परिषदेचे माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे राजेश राठोड हे चिरंजीव आहेत. धोंडीराम राठोड देखील जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. राठोड कुटुंब हे काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते. राठोड यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळेच त्यांना विधान परिषदेचेची उमेदवारी देऊ केल्याचे बोलले जात आहे, अशी चर्चा सध्या सुरुवात सुरू आहे.

कोण आहेत राजेश राठोड ?

काँगेससोबत असलेले धोंडीराम राठोड यांची सन 2002 ते 2008 राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर दोघेही पितापुत्र काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले आहेत. दरम्यान 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राजेश राठोड यांनी मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातून पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मागितले होते. विशेष म्हणजे या मुलाखती घेणाऱ्यांमध्ये धोंडीराम राठोड यांचाही समावेश होता. त्यामुळे मुलाने पित्याकडे तिकिटाचा हट्ट धरला होता. परंतु निवड समितीपुढे हा हट्ट टिकला नाही. त्यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांची वर्णी लागली.

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर काम केलेल्या राजेश राठोड यांच्याकडे सध्या काँग्रेसचे कोणतेही पद नाही. तरिही मंठा तालुक्यात जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते सचिव आहेत. या संस्थेअंतर्गत विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय सुरू आहेत. शिक्षण संस्था आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून त्यांचा मंठा आणि परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजाची दांडगा जनसंपर्क आहे. जालना जिल्हा परिषदेचे माझी सदस्य तथा समाज कल्याण विभागाचे माजी सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details