महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बँक व्यवस्थापकाचा स्तुत्य उपक्रम; खातेदारांच्या दारात जाऊन केली जातेय अर्जाची पूर्तता - जालना जिल्हा बातमी

कोरोना महामारीच्या काळात बँकेत गर्दी होऊन विषाणू प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी परतूर तालुक्यातील वाटुर फाटा शाखेच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थपकांनी एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. व्यवस्थापक निलेश नारायणकर हे सध्या गावोगावी फिरून कर्जमाफीचे आणि नव्या कर्जासाठीचे अर्ज भरून घेत आहेत.

Maharashtra Gramin Bank
महाराष्ट्र ग्रामीण बँक

By

Published : Jun 5, 2020, 6:39 PM IST

परतूर (जालना) : शासनाच्या सर्व योजना बँकांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागात राबविल्या जातात. त्यामुळे अशा ठिकाणच्या बँकांमध्ये प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात बँकेत गर्दी होऊन विषाणू प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी परतूर तालुक्यातील वाटुर फाटा शाखेच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थपकांनी एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. व्यवस्थापक निलेश नारायणकर हे सध्या गावोगावी फिरून कर्जमाफीचे आणि नव्या कर्जासाठीचे अर्ज भरून घेत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बँक व्यवस्थापकाचा स्तुत्य उपक्रम; खातेदारांच्या दारात जाऊन केली जातेय अर्जाची पूर्तता

हेही वाचा...औरंगाबादला वाघाच्या पिंजऱ्यात झोपला तरुण, थोडक्यात वाचला जीव

परतूर तालुक्यातील वाटुर फाटा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सन 2020-21 च्या कर्जमाफी यादीत मे महिन्यात 1,150 खातेदारांसाठी पाच कोटी 60 लाख एवढी रक्कम आली. त्यापैकी 650 खातेदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे ही खाती आता अद्ययावत आहेत. त्यापैकी 300 खातेदारांच्या खात्यावर मे महिन्यामध्ये 1 कोटी 80 लाख रुपये जमा झाले आहेत. ही सर्व रक्कम जमा करण्यासाठी कर्जमाफीचे अर्ज भरणे आवश्यक आहे. ते अर्ज भरुन घेण्यासाठी शाखा व्यवस्थापक निलेश नारायणकर हे आता यदलापूर, पांगरी गोसावी, गुळखंड, लावणी, वाई, अशा एकूण 18 गावांमध्ये स्वतः फिरले आहेत. या गावांचा व्यवहार हा याच ग्रामीण बँकेच्या माध्यमातून होत असल्यामुळे कर्जमाफीची प्रकरणे देखील याच बँकेकडे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची या अर्ज प्रक्रियेसाठी बँकेमध्ये गर्दी करु नये. त्यांचा जाण्यायेण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचावा. तसेच शासनाने घालून दिलेल्या फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही पालन व्हावे. हा यामागील उद्देश असल्याचे व्यवस्थापक नारायणकर यांनी सांगितले.

या बँकेमध्ये सुमारे 16 हजार खातेधारक आहेत. बाहेर गावी जाऊन अर्ज भरून घेण्यासाठी बँकेने सुरू केलेला हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून सचिन मेश्राम, लिपिक म्हणून मिथुन चव्हाण, प्रकाश वर्गणे यांच्यासह शिपाई विलास सिद्धेश्वर, रामप्रसाद मुजमुले या अत्यंत तोकड्या कर्मचारी वर्गामध्ये देखील बँक हा उपक्रम राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details