महाराष्ट्र

maharashtra

'कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार बांगलादेशाकडून करणार 10 हजार इंजेक्शनची खरेदी'

By

Published : Jun 6, 2020, 7:34 PM IST

कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. राज्य सरकार रेमडेसिविरच्या 10 हजार इंजेक्शनची खरेदी करणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही वाढत आहे. ग्रामीण भागातील जनतेकडे उपचारासाठी आवश्यक ती जमापूंजी असत नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब जनता आणि कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. राज्य शासन कोरोनावर उपचार करण्यासाठी या आजारावर चांगला परिणामकारक ठरेल, अशा रेमडेसिविरच्या 10 हजार इंजेक्शनची खरेदी करणार आहे. ज्यांची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे.

बांगलादेशातील एका औषध उत्पादक कंपनीकडून ही औषध खरेदी केली जाणार आहे. याबाबतचा ठराव झाला असून लवकरच याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज (शनिवार) जालना येथे आढावा बैठकीसाठी आले होत. यावेळी त्यांच्यासोबत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची उपस्थिती होती.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...कोरोनाचा विकासकामांना संसर्ग; जिल्ह्यांच्या निधीत सरकारकडून 67 टक्के कपात

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या आरोग्याचा आढावा घेण्यासाठी टोपे यांनी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील सर्व सोईसुविधांनी युक्त असलेल्या मोठमोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या डॉक्टरांना प्रत्येकी तीन तास कोरोना रुग्णांना सेवा देण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य रुग्णांचे स्व‌ॅब नमुने तपासण्यासाठी आता औरंगाबादला जाण्याची गरज नाही. या तपासणीसाठी पुढील आठवड्यामध्ये जालन्यातच प्रयोगशाळा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष बाब म्हणून सव्वा कोटी रुपये खर्चही मंजूर झाला आहे. या प्रयोगशाळेत फक्त कोरोनाच्याच नव्हे तर इतरही आजारांच्या तपासण्या केल्या जातील, अशीही माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची केली कानउघडणी...

जालना जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सोईसुविधा निर्माण करणे आणि उपाययोजना राबवण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे असते. सध्या जिल्ह्यात या विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर हे कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या कामावर आरोग्यमंत्र्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे काम अपेक्षित नाही. त्यांनी यामध्ये वेळीच दुरुस्ती करावी, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details