महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेत ग्वाही - ravsaheb danve

2004 ते 2014 पर्यंत ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका या ईव्हीएम मशीन वरच झाल्या आणि ते निवडून आले, मात्र आता ज्या वेळेस ते पडले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खराब कशा? एवढेच नव्हे तर सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या मशीन चांगल्या आणि रावसाहेब दानवे निवडून आले तर त्या खराब हे असं कसं? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 27, 2019, 11:18 PM IST

जालना- मराठवाड्याच्या मागे सातत्याने पाचवीला पुजलेला दुष्काळ लागला आहे. परंतु या सरकारने संकल्प केला आहे की, या पिढीने जो दुष्काळ पाहिला आहे तो दुष्काळ पुढील पिढीला पाहू द्यायचा नाही. त्यासाठी उपाययोजनाहीही केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आंबड येथे दिली. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा मतदारसंघ असलेल्या आंबड येथे महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, भोकरदनचे आमदार संतोष दानवे, अंबडच्या नगराध्यक्षा कुचे आदींची उपस्थिती होती.

पुढील पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ हटविण्यासाठी सर्व योजना तयार आहे. मराठवाड्यातील सर्व धरणे एक दुसऱ्याला जोडली जाणार आहेत. या धरणाच्या ग्रीडचे उद्घाटन दोन-तीन दिवसात होणार आहे. त्याचसोबत कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. हे 167 टीएमसी पाणी लिफ्ट करून बोगदे आणि धरणांच्या माध्यमातून गोदावरीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना हे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि मराठवाड्यातील दुष्काळ बंद होऊन तो सुजलाम सुफलाम होईल. ही योजना काही आम्ही आणलेली नाही अशी कबुली देतानाच मुख्यमंत्री म्हणाले की, चाळीस वर्षापासून अशा योजनेची मागणी होती. परंतु आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने हे काम केले नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला दुष्काळा सारखी परिस्थिती आम्ही ठेवणार नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षावर टीका करताना ते म्हणाले की, ते आजही हार मानायला तयार नाहीत. आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशीनने पराभूत केल्याचे सांगत आहेत. खरेतर 2004 ते 2014 पर्यंत ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका या ईव्हीएम मशीन वरच झाल्या. आणि ते निवडून आले, मात्र आता ज्यावेळेस ते पडले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खराब कशा? एवढेच नव्हे तर सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या मशीन चांगल्या आणि रावसाहेब दानवे निवडून आले तर त्या खराब हे असं कसं? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

खासदार दानवे यांचे आव्हान
केंद्रीय राज्यमंत्री खासदार दानवे यांनी विरोधकांना व्यासपीठावरून आव्हान केले. ते म्हणाले की, विरोधी पक्षाने देखील अशाच पद्धतीचे स्टेज तयार करावे आणि या स्टेजवर आम्हालाही बोलवावे. आणि दोघांनी पंधरा वर्षात केलेल्या विकासाविषयी चर्चा करावी. ज्या पक्षाने विकास कमी केला असेल त्याने निवडणूक लढवणे सोडून द्यावे. त्यासाठी आपण विरोधी पक्षाला आव्हान देत असल्याचेही खासदार दानवे म्हणाले .

ABOUT THE AUTHOR

...view details