जळगाव - भाजपने उमेदवारीचा पत्ता कापल्यानंतर राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे महाआघाडीवरील प्रेम जरा जास्तच दिसून येतंय. विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील रावेर येथे भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी खडसेंनी महा आघाडीलाच सत्तेचा कौल मिळेल, असे विधान केले. येणाऱ्या २४ ऑक्टोबरचा निकाल हा महाआघाडीच्याच बाजूने लागणार आहे, असे खडसे यांनी म्हटल्यावर शेजारी बसलेले हरिभाऊ जावळे यांनी ही बाब खडसेंच्या लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंनी सॉरी म्हणत आपली चूक सुधारली.
राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे सूतोवाच करताच एकनाथ खडसे यांना झालेली चूक ध्यानात आली. क्षणार्धात त्यांनी सावरत, आमच्याकडे ते नाथाभाऊला पाडण्यासाठी आघाड्या बिघाड्या सुरू आहेत ना... त्यामुळे महाआघाडी चुकून तोंडात आले. महायुतीचेच राज्य येणार, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी प्रकट केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे, उमेदवार हरिभाऊ जावळे उपस्थित होते. खडसे पुढे म्हणाले, बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. मात्र, नाथाभाऊ भाजपमध्येच आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊको गिराओ... म्हणून आघाड्या बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया नही तो छोड दिया... तीर लगा तो ठीक है... नही तो कमान अपने पास है, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.