जालना - मुस्लिम समाजामध्ये चंद्रकोरला अनन्य साधारण महत्व आहे. अशा प्रकारची चंद्रकोर एखाद्या बोकडाच्या माथ्यावर असेल तर, त्या बोकडांची कुर्बानी देणे ही भाग्याची गोष्ट समजली जाते. म्हणून अशा बोकडांना भाव देखील चांगला मिळतो. जालना तालुक्यातील पाहेगाव येथील गणेश माधवराव चव्हाण यांच्याकडेही अशाच प्रकारची दोन बोकडे आहेत.
गणेश चव्हाण यांच्याकडे असलेल्या बोकडांपैकी एका बोकडाला दीड वर्षापूर्वी सहा महिन्याच्या असताना विक्रीसाठी बाजारात नेले होते. मात्र, त्यांच्या एका मुस्लिम मित्राने या बोकडाच्या माथ्यावर असलेली चंद्राची अर्ध कोर आणि अंगावर विशिष्ट प्रकारच्या रेषा यामुळे या बोकडाची भविष्यात चांगली किंमत येईल असे सांगितले. त्याचे महत्त्व वेगळे आहे, असे सांगितले. त्यामुळे गणेश चव्हाण यांनी हा बोकड घरी आणून गेल्या दीड वर्षापासून त्याची वेगळी खातिरदारी केली.
लाखोंचा भाव असलेला सोन्या नावाचा बोकड मालकासाठी ठरतोय खऱ्या सोन्यासारखा... हेही वाचा -हज यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट.! भारतातील 2 लाख भाविक हज यात्रेपासून वंचित
साधारणपणे शेळी प्रकारातील जनावरांची नावे ठेवली जात नाहीत. मात्र, या बोकडाचे खास "सोन्या" असे नाव ठेवले आहे. हा सोन्या सध्या दीड वर्षाचा झाला आहे आणि ईद साठी तो विक्रीला देखील उपलब्ध आहे. साधारणपणे सामान्य बोकडाची वीस ते पंचवीस हजार रुपये किंमत मिळते. मात्र, हा बोकड विशेष असल्यामुळे याला दहा ते बारा लाखात मागणी असल्याची माहिती या बोकडाचे मालक गणेश माधवराव चव्हाण यांनी दिली.
या बोकडाच्या विशेष महत्वामुळे अन्य शेळ्या मेंढ्यांप्रमाणे याला शेतात चारण्यासाठी देखील सोडले जात नाही. अडचणीच्या वेळी सोडायचे काम पडले तर गणेश चव्हाण यांचे वडील माधवराव चव्हाण आणि आई पारूबाई चव्हाण यांच्याकडे सोडले जाते. जेणे करुन ते या बोकडाची विशेष काळजी आणि सांभाळ करतात. या बोकडाला सांभाळणे ही देखील जोखीम असल्याचे मत गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
सध्या या बोकडाला बारा लाखात मागणी आल्याचे सांगून यापेक्षाही जास्त भाव मिळेल, अशी अपेक्षा गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबत पुढील तीन दिवसांमध्ये ईदच्या निमित्ताने बोकडांची कुर्बानी दिली जाते. कदाचित हा कुर्बानीसाठी नाही विकला गेला, तरी मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक चंद्रकोर असलेल्या अशा बोकडाचा सांभाळ करणे हे भाग्याचे लक्षण समजतात. त्यामुळे या बोकडाला चांगला भाव येईल, म्हणून आजही ते जोखीम पत्करून या बोकडाचा सांभाळ करत आहेत.