जालना- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्यासाठी एलआयसीने हप्ते भरण्याचे शहरातील काउंटर बंद केले आहे. त्यामुळे विमाधारकांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. मात्र हे हप्ते भरण्यासाठी विमा कंपनीने मार्गदर्शक तत्वे अवलंबली असल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती विमा कंपनीच्या शाखा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना इफेक्ट; संचारबंदीच्या काळात एलआयसीच्या थकलेल्या हफ्त्यांना व्याज, दंडातून सुटका - एलआयसी
संचारबंदी असल्यामुळे हप्ते भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये विमाधारकांना हप्ता भरण्यासाठी अडचण येत आहे. मात्र यासंदर्भात एलआयसीने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
मुख्य कार्यालयाच्या बाहेर पेटी ठेवून धनादेशाद्वारे देखील हा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेक ग्राहकांना ही सुविधा माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यानच्या काळात काही दुर्घटना घडल्यास कंपनी नुकसान भरपाई देणार नाही, अशी भीती देखील ग्राहकांना वाटत आहे. मात्र यासंदर्भात एलआयसीने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. संचारबंदीच्या काळात जर हप्ता थकला असेल, तर त्याबाबत ग्राहकांनी काळजी करू नये. या थकलेल्या हप्त्याबद्दल कंपनी सहानुभूतीने विचार करेल आणि नंतर भरून घेईल. दरम्यानच्या काळात कोणत्याही ग्राहकाला चालू हप्ता थकल्यामुळे व्याज किंवा दंड आकारल्या जाणार नाही, असेही एलआयसीचे शाखा व्यवस्थापक बापूसाहेब ठोंबरे यांनी सांगितले.