बदनापूर (जालना) -तालुक्यातील वाल्हा येथील धरण निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा भरण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीतून तसेच कालवा आऊटलेटच्या भिंतीतून चक्क पाण्याच्या धारा लागल्या आहेत. यामुळे कामाच्या दर्जाबददलच शंका व्यक्त होत आहे. तर प्रशासनाच्या वतीने त्याची तपासणी करण्यात येऊन उपाययोजना करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. तरीही सांडव्यातून तीन ते चार ठिकाणी चक्क खाल्याच्या बाजूने पाणी झिरपत असल्यामुळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.
वाल्हा प्रकल्पात मोठा पाणी साठा: सांडवा गळतीमुळे भीतीचे वातावरण बदनापूर तालुक्यातील मौजे वाल्हा येथे सोमठाणा बृहत ल. पा. प्रकल्प, ही योजना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण अनुषेश क्षेत्रातील आहे. जालना जिल्ह्याच्या निकळक गावाच्या स्थानिक नाल्यावर बांधाण्यात आलेली आहे. या प्रकल्पास ३० जानेवारी २००१ अन्वये मूळ प्रशासकीय मान्यता ११.०४ कोटी (दर सूची वर्ष 1999-2000) एवढी होती. या प्रकल्पात पाणी साठा 9.43 द.ल.घ. मि. इतकी असून सिंचन क्षमता 684 हेक्टर इतकी असून सिंचनाचा लाभ बदनापूर तालुक्यात मिळणार होता. मूळ 11.04 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी याची अद्ययावत किंमत 36.55 कोटी रुपये इतकी झाली. या प्रकल्पाचे काम २००५ साली सुरू करण्यात आलेले होते. याचा मुख्य कालावा 6.21 कि.मी. लांबीचा डावा कालवा तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची अद्ययावत किंमत 36.55 कोटी रुपये होती तर मार्च 2019 पर्यंत 34.09 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात आलेला आहे. या धरणात २०११ साली 3.43 द.ल. घ. मि., २०१२ मध्ये जोते पातळी खाली, २०१३ साली जोते पातळी खाली २०१४ साली जोते पातळी खाली, २०१५ मध्ये 1.07 दृ लृ घ. मि., २०१६ मध्ये कोरडा, २०१७ मध्ये 2.29 द. ल. घ. मि., २०१८ साली कोरडा, २०१९ मध्ये कोरडा तर यंदा 2020 (२९ सप्टेंबर २०२० पर्यंत) 6.60 द. ल. घ. मि. पाणी साठा जमा झालेला आहे. या प्रकल्पाची लांबी 2900.00 मिटर एवढी असून सांडावा लांबी 220.00 मि. तर कालव्याची लांबी 2500 मीटर एवढी आहे. या धरणाची एकूण क्षमता 9.40 द.ल.घ. मि. असून उच्च्तम पाणी पातळी 537 घ. मि. तर लघुतम पाणी पातळी 532.70 मीटर एवढी आहे. या प्रकल्पामुळे बदनापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतजमीन सिंचनासाठी येणार असल्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.सदरील प्रकल्प निर्माण झाल्यानंतर आतापर्यंत या प्रकल्पात मोठा पाणी साठा झालेला नव्हता. यंदा 2020 मध्ये तालुक्यातील प्रर्जन्यमान्य सुधारल्यामुळे या प्रकल्पात मोठा पाणीसाठा जमा झाला. व लघु पाटबंधारे विभागाने करवून घेतलेल्या कामाचा दर्जाही या पाण्यामुळे उघडकीस आला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीतून तीन ते चार ठिकाणाहून अर्धा इंच आकाराचे पाणी नळासारखे गळत आहे. तर सांडव्याच्या भिंतीखालील पाणी झिरपत आहे. सांडव्याच्या भिंतीतून पाणी झिरपत असल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. सांडवा व कालव्याच्या आऊटलेट भिंतीतून पाणी झिरपत असल्यामुळे परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत..या बाबत लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता व्ही. डी. ढाकणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वर्षी पहिल्यांदाच या प्रकल्पात मोठा पाणी साठा झालेला आहे. आम्ही या प्रकल्पाची नियमित पाहणी करत असतो. कालवा आऊटलेटमधून पाणी गळती होत असल्याची बाब आढळून आलेली आहे. पहिल्यांदाच मोठा पाणी साठा झालेला असल्यामुळे हे होत असून लघु पाटबंधारे विभागाकडून त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहेत. सांडवा व कालवा आऊटलेट अतिशय सुस्थितीत असून त्याला कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.