जालना-Lathicharge in Jalna अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण स्थिती आलीय. गावकऱ्यांकडून दगफेड करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मराठा आक्रोश मोर्चाचा आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस सुरू होता. चर्चेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचेही सांगण्यात येत आहे.
जालन्यातील शहागड येथे आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं.आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. त्यात आज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात काही पोलिस अधिकारी कर्मचारी महीला कर्मचारी जखमी झाले आहेत. काही गावकरीदेखिल जखमी झाले आहेत. दगडफेकीमध्ये २० ते २५ पोलीस जखमी आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
आंदोलकांकडून जाळपोळ-चार दिवसापासून शांततेत असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलयं. वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांनी दोन बस जाळल्या आहेत. दोन बसवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक सुद्धा जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड करण्यास सुरुवात केलीय. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा बोलवण्यात आलाय. पोलिसांनी गोळीबार केल्याचाही आंदोलकांकडून आरोप होत आहे.