जालना - जालना तालुक्यातील पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि निवासस्थानांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या आरोपावरून जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांनी हे काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कंत्राटदाराने या आदेशाला केराची टोपली दाखवत काम सुरूच ठेवले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत जालना राजूर रस्त्यावर १५ कि.मी अंतरावर पीर पिंपळगाव हे महत्त्वाचे गाव आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला अन्य ४ उपकेंद्र जोडलेले आहेत. त्यामुळे परिसरात या आरोग्य केंद्राचा जनतेला मोठा फायदा होतो. त्यासाठी शासनाने ४ कोटी ४१ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम हाती घेतले आहे. सुमारे २५ कर्मचारी या उपकेंद्रा अंतर्गत काम करतात.
मागील महिनाभरापासून सुरू झालेल्या या इमारतीचे काम कृष्णा कोरडे या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांनी २० जून रोजी काम बंद करण्याचे आदेश दिले होते.
सर्व सत्ताधारी एकाच पक्षाचे तरी....
पीर पिंपळगाव येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जालना जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे शिवसेनेचे आहेत. तसेच जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, पिंपळगाव येथील सरपंच मनीषा कृष्णा कोरडे याही शिवसेना पक्षाच्या आहेत. आरोग्य केंद्राचे काम मिळाले गुत्तेदारही शिवसेनेचे कार्यकर्ते तथा सरपंचाचे पती आहेत. यासंदर्भात येथील डॉक्टर मिर्झा बेग यांनी आपला या बांधकामाशी प्रत्यक्ष काही संबंध नाही, असे बोलून हात झटकले आहेत.