जालना - जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये आरोग्य विभागाने माजलगावच्या एका संस्थेला दिलेल्या कामावरून चांगलीच खडाजंगी झाली.
जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष महेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, नामदेव केंद्रे, महिला व बालकल्याण सभापती अयोध्या चव्हाण यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची उपस्थिती होती.
सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाच्या कामावरून खडाजंगी
हेही वाचा-Mumbai Corona : धारावी दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर वर्षभरात सातव्यांदा रुग्णसंख्या शून्यावर
18 कोटींची कामे थांबली -
जिल्हा विकास नियोजन मंडळाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी 18 कोटी रुपये दिले होते. या कामांना 31 मार्चपूर्वीच परवानगीही दिली आहे. मात्र, जिल्हा परिषदेने ही कामे सुरुच केली नाहीत. त्यामुळे ही कामे कोणी अडविली आहेत ? त्याची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके यांनी लावून धरली. तसेच पावसाळा असल्यामुळे सहा महिने ही कामे होणार नाहीत, असेही सभागृहाला सांगितले. परंतु या कामाची परवानगी देण्यात आली आहे. ही कामे सुरू करता येतील, अशी माहिती उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी दिल्यामुळे हा वाद इथेच संपुष्टात आला.
हेही वाचा-मोफत धान्यांसह लसीकरणाकरिता सरकारवर अतिरिक्त १.०५ लाख कोटींचा भार- एसबीआय
30 लाखांची आरोग्य विभागाची कामे
15 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीस लाख रुपयांच्या कामासाठी प्रस्ताव मांडला होता. तो सभागृहाने मंजूर केला. परंतु मांडलेल्या प्रस्तावातील दर आणि जिल्हा परिषदेने संबंधित संस्थेला दिलेले दर यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे सभागृहाची दिशाभूल करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य शालीग्राम मस्के यांनी केला. या संबंधात निघालेल्या निविदा आणि टिपणीचा पूर्ण व्यवहार पाहण्यासाठी ही संचिका सभाग्रहात आणण्यासाठी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व संचित केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची सही असल्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाला सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी उचलून धरले. हा विश्वासघात असल्याचा आरोप सर्वांनीच केला. हे काम करत असताना आरोग्य विभागाने स्थायी समितीच्या सदस्यांना विचारात घेणे अपेक्षित होते मात्र याबद्दल कोणतीच माहिती न दिल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर चंद्रकांत साबळे यांनीदेखील सभागृहाला धारेवर धरले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी जिल्हा परिषद सभागृहमध्ये जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांनी सभागृहाला निवेदन केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांचे तूर्तास समाधान झाले आहे.
हेही वाचा-अंधश्रद्धेचा अघोरी खेळ! सर्पदंशाने मरण पावलेल्या तरुणाला जीवंत करण्याचा प्रयत्न
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, अवधूत नाना खडके, सतीश टोपे, जयमंगल जाधव व आदी सदस्यांची उपस्थिती होती.