जालना - कोरोना महामारी आणि या महामारीच्या काळात अनेक व्यवसायांवर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली. असे असताना एक व्यवसाय तेजीमध्ये असल्याचे चित्र आता पाहावयास मिळत आहे. वाहन उत्पादनापासून विक्रीपर्यंतचे सर्व घटक, सर्व विभाग या काळात अत्यंत तेजीमध्ये असल्याचे समोर आले आहे.
एवढ्या वाहनांची केली जालनाकरांनी खरेदी
31 मार्च 2019पर्यंत जालनाकरांनी विविधप्रकारच्या 29 हजार 91 एवढ्या विविध वाहनांची खरेदी केली होती. हीच खरेदी यावर्षी 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंत 25 हजार 550 एवढी झाली आहे. आणखी एक एप्रिलसाठी चार महिने बाकी आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा निश्चितच वाढणार आहे. जर दुचाकीचा विचार करायचा झाला, तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019मध्ये प्रत्येकी 1271, 2309 आणि 3663 दुचाकी खरेदी केल्या होत्या. तोच आकडा यावर्षी आता 3571, 1788 आणि 7224 असा झाला आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तीन महिन्यांमध्ये ७ हजार 243 दुचाकी विकल्या गेल्या. त्याच ठिकाणी यावर्षी 2020मध्ये 12, 583 दुचाकी विकल्या गेल्या आहेत.
किंमती वाढल्या तरीही विक्री वाढली
1 एप्रिल 2020पासून केंद्र सरकारने सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना आदेश देऊन इंजिनमध्ये असलेल्या bs4 या प्रकाराचे bs6मध्ये हे बदल करून उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. या बदलामुळे प्रदुषणाची पातळी घटणार आहे आणि अर्थातच हे बदल वाहनांची गुणवत्ता तर वाढवतीलच त्याचसोबत प्रत्येक वाहनामागे दहा ते पंधरा हजार रुपये किंमतदेखील वाढली आहे. असे असतानाही वाहन खरेदीचा व्यवसाय तेजीत आहे. याचे कारण म्हणजे covid-19. गेल्या नऊ महिन्यांपासून सार्वजनिक प्रवासाची, वाहतुकीची वाहने बंद आहेत. त्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे. त्याकरिता प्रत्येकाने आता आपली स्वतंत्र यंत्रणा राबविण्याचे ठरविले आहे. त्यातूनच हा वाहनविक्रीचा व्यवसाय वाढला आहे. इतके दिवस पैसा असूनही सरकारी वाहने असल्यामुळे स्वतंत्र वाहनाची गरज भासत नव्हती. मात्र यावर्षी अशा प्रकारची वाहने टाळेबंदीमुळे बंद असल्यामुळे प्रत्येकाने आपली आपली व्यवस्था केली आहे आणि यातूनच या वाहनांचा बाजार तेजीत आहे.
'सेकंड हॅन्ड' गाड्यांनाही विक्रमी भाव
दोन वर्षांपूर्वी एका दुचाकीचा जो नवीन भाव होता, त्याच भावात किंवा त्याहीपेक्षा जास्त भाव आज जुन्या गाड्यांना द्यावा लागत आहे. याचे कारण म्हणजे इंजिनमध्ये झालेला बदल आणि या बदलामुळे नवीन गाड्यांचे, नवीन वाहनांचे वाढलेले भाव आहे. चार महिन्यांपूर्वी जुन्या वाहन बाजारांमध्ये प्रचंड गर्दी होती. मात्र आता जुन्या वाहनांमधील आणि नवीन वाहन खरेदीमधील अंतर फक्त 20 ते 25 हजार रुपयांचे राहिलेले असल्यामुळे खरेदीदारांनीही जुन्या वाहनांकडे पाठ फिरवून नवीन वाहन खरेदीसाठी प्राधान्य दिले आहे.
मागील वर्षी आणि यावर्षीच्या वाहन खरेदीची तुलना
31 मार्च 2019पर्यंत 23 हजार 953 मोटार सायकल, 31 मोपेड अशा एकूण 23 हजार 984 दुचाकी विकल्या गेल्या. तर 1419 कार आणि 115 ट्रॅक्टर विकले गेले. हीच संख्या 30 नोव्हेंबरला २०२० पर्यंत 20 हजार 515 मोटरसायकल, 44 मोपेड अशा एकूण 20 हजार 559 दुचाकी विकल्या गेल्या. त्यानंतर 103 ट्रॅक्टर विकले गेले आहेत. तुर्तास वाहनांची संख्या जरी आज कमी असली तरी आणखी चार महिने बाकी आहेत. त्यामुळे वाहन खरेदीचा हा आलेख वाढतच जाणार आहे.