जालना Jalna to Mumbai Vande Bharat Train :पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत. तसंच पंतप्रधान 30 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या भेटीदरम्यान पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेनं जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) ट्रेनचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
असं आहे वेळापत्रक : 30 डिसेंबर 2023 रोजी आठ डब्याची वंदे भारत ट्रेन सकाळी 11 वाजता जालना येथून निघणार आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) सकाळी 11:55 वाजता पोहचेल. त्यानंतर 11:57 वाजता वंदे भारत छत्रपती संभाजीनगरहुन रवाना होईल. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर दुपारी 1:42 वाजता, नाशिकरोडला 2:44 वाजता, कल्याण जंक्शन 5:06, ठाणे येथे 5:28, दादरला 5:50 आणि सीएसएमटी मुंबईला 6:45 वाजता पोहचणार आहे.
मोदी दाखवणार हिरवा झेंडा : याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम जंक्शनवरून वेगवेगळ्या शहरांदरम्यानच्या 2 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नांदेड विभागाच्या डीएमआर निती सरकार यांनी पत्रकार परिषद घेऊन वंदे भारत रेल्वेबाबत माहिती दिली. 'वंदे भारत एक्सप्रेस जालना येथून सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी निघेल. सहा तास-पन्नास मिनिटांमध्ये ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गाडी केवळ दोन-दोन मिनिटं थांबणार आहे.