जालना - उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने जालना तालुक्यातील अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या घराची झडती घेण्यात आली. या कारवाईमध्ये नऊ दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या कागदपत्रांची सविस्तर तपासणी महसूल विभाग आणि पोलीस करत आहेत.
अवैध सावकाराच्या घराची झडती; महसूल विभागाने केले नऊ दस्तऐवज जप्त - जालना अवैध सावकार कारवाई न्यूज
शासनाने कायदे करूनही अद्याप ग्रामीण भागात खासगी सावकारी सुरूच आहे. हे सावकार अडाणी, गरीब लोकांची लूट करतात. जालन्यात अशाच एका सावकारावर कारवाई करण्यात आली.

जालना तालुक्यातील साळेगाव तांडा (नेर) येथील एका महिलेने जिल्हा निबंधकांकडे गावातीलच अवैध सावकारी करणाऱ्या गणेश सिताराम चव्हाण याच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी उपनिबंधक पी. व्ही. वरखडे यांना तपासणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आज एका पथकाने गणेश सिताराम चव्हाणच्या साळेगाव येथील घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पथकाने एकूण नऊ प्रकरणांची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईसाठी पोलीस प्रशासन, महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाच्या नऊ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014च्या कलम 16 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.