जालना - बचत गटाकडून कर्जाची वसूल केलेली रक्कम आणि बचत गटाला कर्ज देण्यासाठी रक्कम घेऊन जाणाऱ्या बचत गटाच्या एजंटला दोनदा लुटणाऱ्या टोळीचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
जालन्यात बचत गटाची रक्कम पळवणारी टोळी गजाआड
बचत गटाच्या रक्कमेवर डल्ला मारणाऱ्याला टोळीला पकडण्यात जालना पोलिसांना यश आले आहे.
भारत फायनान्स लिमिटेड, मुंबई. या कंपनीचे अंबड येथे शाखा आहे. ही शाखा घनसांगी शहरांमध्ये महिला बचत गटाला कर्ज देण्याचे काम करते. या बचत गटांना कर्ज देणे आणि त्यांच्याकडून कर्जाची रक्कम वसूल करणे हे काम अंबड येथूनच हाताळले जाते. ८ महिन्यापूर्वी महिला बचत गटाच्या कर्जपुरवठ्यासाठी अंबड येथून एजंट येणार असल्याची माहिती या टोळीला मिळाली होती. त्यानंतर घनसावंगी येथे कर्जाची रक्कम जमा करुन संबंधित कर्मचारी मोटर सायकल वरून घनसांगवी येथून निघाल्यानंतर रस्त्यामध्ये समा भगवान जाधव (रा. रामगव्हाण) सय्यद बशीर सय्यद हमीद (रा.घनसावंगी) राजेंद्र भगवान गायकवाड (रा. कैकाडी मोहल्ला,जालना) या ३ जणांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मोटार सायकल वरुन पाठलाग केला आणि दुपारच्या वेळी मोहपूरी फाट्याजवळ त्याची मोटारसायकल अडवून हाणामारी करुन एक लाख ३० हजार रुपये आणि एक टॅब पळवून नेला.
दीड महिन्यापूर्वी देखील असाच प्रकार झाला. यामध्ये ९८ हजार रुपये पळवून नेण्यात आले होते. आरोपींची माहिती शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी आज तीर्थपुरी फाटा ते सूतगिरणी दरम्यान या आरोपींना पकडले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.