जालना :मोती तलावातील हे मासे एखाद्या संसर्गजन्य आजाराने मेले असावे, असा अंदाज पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच मृत माशांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथिल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही हे मासे नक्की कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मेले याची अजूनही खातरजमा झालेली नाही. शिवाय रिपोर्ट देखील आलेला नाही. दरम्यान तलावात मोठ्या प्रमाणात मेलेले मासे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी डंम्पिंग ग्राउंडवर आणून फेकले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
उघड्यावर हे मासे आणून टाकले : विशेष म्हणजे नगर परिषदेचे कर्मचारी हे मेलेले मासे जेसीबीच्या सहाय्याने एखादा खड्डा करून या खड्ड्यात हे मासे पुरून टाकून त्यांची विल्हेवाट लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र नगर परिषद कर्मचाऱ्यांनी थेट डंम्पिंग ग्राउंडवर उघड्यावर हे मासे आणून टाकली. त्यामुळे 5 किलोमीटरपर्यंत या माशांची दुर्गंधी पसरली आहे. आता या प्रकारामुळे नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या समस्येकडे कुणीतरी लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.