जालना -यंदा सर्वच सणावारांवर कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनामुळे व्यापाऱ्यांवरही वाईट वेळ आली. दसरा-दिवाळी सणांमध्ये पणत्या, बोळके आणि घट विकले गेले नव्हते. महिला आवा लुटतील आणि दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या कुंभारांवरदेखील संक्रांत आली आहे. संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाण्यासाठी सुगडे (लहान आणि मोठे बोळके)पणती या कुंभाराच्या साहित्याला मानाचे स्थान आहे. त्यामुळे संक्रांतीपुर्वी महिला एकत्र जाऊन कुंभाराकडे लागणाऱ्या साहित्याची नोंदणी करतात आणि नंतर त्याच्याकडून हे साहित्य घेऊन येतात त्यालाच कुंभाराचा आवा लुटणे असे म्हणतात. मात्र कोरोनामुळे एकाही कुंभाराचा आवा लुटला नाही. त्यामुळे कुंभारांना मिळणारे अतिरिक्त दहा-बारा हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
कलेची किंमत नाही
दिवसभर मातीमध्ये काम करूनदेखील पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. 5 छोटे तुळशी खण (बोळके) आणि पाच मोठे तुळशी खण असे दहा नग फक्त तीस रुपयांना विकले जातात. त्यामुळे मेहनतीचा आणि आणि ते भाजण्यासाठी लागणाऱ्या लाकडाचा खर्चही ही मोठ्या मुश्किलीने निघतो आहे. त्यानंतर बाजारात जाऊन विकणे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. कारण दुकान आणि ग्राहकांची खात्री नाही. अशा परिस्थितीत केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून हा समाज आजही संस्कृती टिकवण्यावर भर देत आहे.