जालना - गेल्या 17 दिवसांपासून गायरान जमिनीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या, कारभारी अंभोरे यांच्या उपोषणाने वेगळे वळण घेतले आहे. आज मंगळवारी उपोषणाचा 17 वा दिवस असतानाही हे उपोषण न सुटल्यामुळे, त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि मध्यस्थी करणाऱ्या संजय देठे या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे उपोषण अधिकच चिघळले आहे.
तीन दिवस शासकीय रुग्णालयात राहिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषणकर्त्याला आज पुन्हा उपोषणस्थळी आणले. त्यासोबत पोलीस फौजफाटा आला. त्यानंतर, पोलिसांनी उपोषण कर्त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि अध्यात्मिक महाराजांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना यामध्ये यश आले नाही. उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.