जालना -जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या विलगीकरण कक्षातून आत्तापर्यंत कोरोनाचे संभाव्य लक्षणे असलेले 9 जण पळून गेले होते. त्यापैकी आठ जण शहरातीलच असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा तपास लावून पकडून परत आणले आहे. मात्र, एक जण हा पुण्याहून यवतमाळला जात असताना विलगीकरण कक्षात दाखल केल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हा तरुण यवतमाळ जिल्ह्यातील घारमोहा या त्यांच्या गावी गेला असल्याची चर्चा आहे.
विलगीकरण कक्षातील संभाव्य रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ठोकला तंबू - jalna corona suspected escaped
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील बाजूला कोरोनाची लक्षणे असलेल्या संशयितांना ठेवण्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या समोरील बाजूने या संशयित रुग्णांना न नेता मागच्या दाराने घेऊन येणे सोपे जात आहे. याचा गैरफायदा घेत, संशयित रुग्णांनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळी कारणे सांगत आठ जण हळूहळू पसार झाले.
याप्रकरणी येथील शिपाई पांडुरंग उत्तमराव सोळुंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून बच्चू खंदारे याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा 2005अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संबंधित तरुण हा यवतमाळपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. संशयित रुग्णांच्या या अशा पळून जाण्यामुळे पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या प्रवेशद्वारासमोर तंबू टाकून तळ ठोकला आहे.आणि इथे 24 तास खडा पहारा ही दिल्या जात आहे. त्यासोबत पाठीमागून असलेल्या प्रवेशद्वाराला नवे करकरीत कुलूप आणून लावलेले आहे. यामुळे निश्चितच पोलीस प्रशासन आणि आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला आहे.