जालना -अर्जुन खोतकर यांनी वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून त्यांची शिवसेनेवर प्रचंड निष्ठा आहे. त्यामुळे, खोतकर यांनी शिवसेनेतच राहावे, त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत, अशी प्रतिक्रिया जालन्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली. खोतकर यांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिंदे गटाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला असला तरी जोपर्यंत स्वतःहून खोतकर शिवसेनेचा त्याग केला, असे म्हणत नाही, तोपर्यंत त्यांनी शिवसेना सोडली, असे म्हणता येणार नाही, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Police Firing : जालन्यात दोन गटात राडा, पोलिसाचा हवेत गोळीबार; हाणामारीत तीन जण गंभीर जखमी
शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा - शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्याने खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. मात्र, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी जाहीर प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.