जालना- मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालन्यात आलेल्या पति-पत्नी आणि एक जण अशा तीन जणांचे अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 44 वर पोहोचली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
मुंबईहून आलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह; जालना जिल्ह्यात रुग्ण संख्या 44 वर
3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44 वर पोहोचली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढत आहे.
जालना तालुक्यातील वडगाव वखारी येथील मूळ रहिवाशी असलेले दोन भाऊ आणि या दोघांपैकी एकाची पत्नी असे तीन जण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालना येथे परतल्यानंतर हे तिघेही वखारी वडगाव येथे न जाता सिद्धेश्वर पिंपळगाव ता.अंबड येथे गेले असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. तिथे गेल्यानंतर तिघांनाही खोकला आणि ताप आल्याने हे तिघेही अंबड येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते.
अंबड येथून या तिघांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे जिल्हावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.