जालना- लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील काही शिवसेना कार्यकर्त्यांनी दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र, ते कार्यकर्ते आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दानवेंकडून होणाऱ्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खोतकर यांच्या बंगल्यावर येऊन त्यांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला.
खासदार दानवे हे विरोधकांची कशी कोंडी करतात ते त्यांनी उघडपणे सांगितले. एकंदरीत खासदार दानवे आणि खोतकर यांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होणे तर सोडाच, मात्र कार्यकर्त्यांचा "कोळसा" होणार यात आता शंकेला जागा राहिली नाही. भोकरदन जाफराबाद हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मागील वर्षभरापासून घुसखोरी करून कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत खासदार दानवेच्या विरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या बाजूने लढा देत दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये भांडणेही केली.