जालना- कायद्याचा भंग केल्यानंतर वाहनधारकांकडून दंड वसूल करताना पोलीस आणि जनता हे दोघेही ही एक दुसऱ्याचे हित जोपासण्याचा प्रयत्न करतात, त्यातून निश्चितच दोघांचाही फायदा करून घेण्याची भाषा वापरली जाते. परंतु आता जालन्यात ई- चालान मशीन आल्यामुळे फक्त पोलीस प्रशासनाचा फायदा होत असून वाहनधारकही वाहतुकीचे नियम पाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताण कमी होऊन दंडाची वसुलीही ही वाढली आहे.
जालना शहरात ८, मे २०१९ पासून ई-चालानद्वारे दंड वसूल करण्यास सुरुवात झाली. या मशीनमुळे वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारा दंडामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यासोबतच वाहनधारकांसोबत होणारे वादविवादही संपुष्टात आले आहेत. परंतु आत्तापर्यंत काम करणारे तेच कर्मचारी असताना वसुली कमी का? हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे .पोलीस प्रशासनाच्या अधिकृत नोंदणीनुसार दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०१७ दरम्यान ११ हजार ८७० वाहनचालकांकडून २६ लाख ३२ हजार ५० रुपये, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान १५ हजार ३८७ वाहनधारकांकडून ३४ लाख ७७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर १ जानेवारीपासून २०१९ ते जून २०१९ पर्यंत ९ हजार १९३ वाहनधारकांकडून २० लाख ५५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी मोठी रक्कम ई-चालान मशीनने वसूल झाली आहे. दिनांक ८ मे ते १६ जून या सव्वा महिन्यातच २ हजार ७९१ वाहन चालकांकडून ५ लाख ९६ हजार ३०० एवढी रक्कम वसूल झाली आहे .वाहनधारकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा कारवाईची गती अशीच चालू राहिली तर वर्षभरामध्ये हे सुमारे ५३ लाख रुपयांचे उत्पन्न या शहर वाहतूक शाखेला होऊ शकते. जालना शहर वाहतूक शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक काकडे यांनी दिनांक ७ जून २०१८ रोजी स्वीकारला होता. त्यावेळपासून त्यांच्या कार्यकालात ४१ लाख ६९ हजार एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
जालना वाहतूक पोलीस शाखेत एकूण ५३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शहर वाहतूक शाखेसाठी ४० ई-चालान मशीन आल्या आहेत. त्यापैकी ३० मशीन या जालना शहरात विविध ठिकाणी कार्यरत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वापरत आहेत. एक मशीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आहे. उर्वरित ९ मशीन सदर बाजार, कदीम जालना, चंदनझिरा, परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड,भोकरदन, आणि बदनापूर, अशा पोलीस ठाण्यात दिलेल्या आहेत. एक मशीन आणि त्यासोबतच्या एक प्रिंटरच्या खरेदीसाठी असा एकूण ३५ हजार रुपये खर्च येतो. जालना शहर वाहतूक शाखेमध्ये पोलीस निरीक्षक काकडे यांच्या नियंत्रणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांच्यासह अशोक आघाव, भगवान नागरे, मनसुबराव नागवे, दत्ता जाधव, छाया मस्के, नम्रता कांबळे आदि कर्मचारी काम करत आहेत.