जालना -जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
9 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दर्शन हिरालाल देवावाले या तरुणाला दीपक हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत भरती करण्यात आले होते. त्यावेळी जखमीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी काही शाश्वती दिली नाही. अशातच या तरुणाचा सात वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झाला. त्यानंतर काही तरुणांनी या हॉस्पिटलमध्ये धुडगूस घालून हॉस्पिटलच्या काचा फोडल्या आणि अग्निशामक यंत्रणाही नादुरुस्त केली. अशा आशयाची तक्रार या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाने 10 एप्रिल रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिली आहे.