जालना - औरंगाबाद आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदान आज पार पडले. जालना तहसील केंद्रावर जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिका सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर कोणीच आले नाही, त्यानंतर मतदानाचा पहिला हक्क बजावला, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहा आलम खान यांनी.
त्यानंतर काही नगरसेवकांनी एक-एक करून येत मतदान केले. एकट्याने येणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांचादेखील समावेश होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचेही मतदार दुपारी एकच्या सुमारास मतदान केंद्रात एकत्र आले. भाजपाचे मतदान होते न होते तोच, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मतदान केले.