जालना- शासकीय दिनदर्शिकेनुसार एक जून पासून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरी देखील अद्यापपर्यंत पाऊस पडलेला नाही, म्हणून आपत्ती ही आपत्तीच असते ती कधीही उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासन या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती देताना. जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या सुमारे 48 गावांना अतिवृष्टीमुळे किंवा जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धोका होऊ शकतो. गोदापत्रातील पाणी हे दीड लाख क्युसेक सोडले तर धोका होण्याची संभावना आहे. परंतु यासाठी अगोदर जायकवाडी धरण पूर्ण भरावे लागेल. आणि त्यानंतरच हे पाणी पात्रात सोडण्यात येईल. त्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. परंतु प्रशासनाने मात्र आतापासूनच आपत्तीला तोंड देण्याची तयारी दर्शविलेली आहे. गोदाकाठच्या 48 गावांत अतिवृष्टी झाली आणि नद्यांना मोठे पूर आले तर जाफराबाद, भोकरदन आणि मंठा तालुक्यांतील अनुक्रमे 2, 3, 3 गावांनाही आपत्ती व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी पूर्ण केलेली आहे.
यासाठी लागणारे प्रशिक्षण संबंधित नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. जालना, परतूर, अंबड, भोकरदन या चारही नगरपालिकेमधील ३० कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस होमगार्ड महसूल, आणि सामान्य रुग्णालयातील अन्य 36 कर्मचाऱ्यांच्या टीमला हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा कोणत्याही आपत्तीशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून दीपक काजळकर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करीत आहेत
आपत्ती व्यवस्थापनाची साहित्य सामग्री -
दहा ते बारा व्यक्ती बसतील एवढा क्षमतेच्या चार रबर बोट, हवेच्या माध्यमातून पाच मिनिटात उभे राहतील असे २ तंबू, १०० लाईफ गार्ड, १०० लाईफ जॅकेट, अडचणीच्या वेळी अंधारामध्ये हवेच्या माध्यमातून उभे राहणारे विजेचे पोल, आणि त्यावर जनरेटर च्या माध्यमातून लागणारे १६ लाईट, १० स्ट्रेचर, अग्निशमन दलासाठी आवश्यक असणारे १० सुट, वायुगळती साठी आवश्यक असणारे मास्कअसलेले १० सूट, १० हेल्मेट.
ही सर्व यंत्रणा पाण्याच्या आपत्तीसाठी आहे. याच सोबत इमारत, झाडे कोसळून पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये १ काँक्रीट कटर, १ ड्रिल मशीन , १ मेटल कटर, आवाहन करण्यासाठी १ मेगाफोन, १०० मीटर लांबीचे नायलॉन आणि १६ तारेचे बंडल अशा पद्धतीने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केलेली आहे.