जालना Jalna Accident : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निरंकारी पंप समोर दुचाकी व ट्रॅक्टरची समोरासमोर जबर धडक झाल्यानं दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वळण घेत असताना अचानक समोरुन टॅक्टरनं धडक दिल्यानं तिघं जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन तिघंही ट्रॅक्टरमध्ये फसले.
अपघातात वडील, मुलगा व अन्य एक जण जागीच ठार : बदनापूर तालुक्यातील ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (38), मुलगा युवराज ज्ञानेश्वर साबळे (13) व आत्मराम कारभारी मस्के (30) हे तिघं जण 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुचाकी (क्र. MH 21 BZ 0453) वर पेट्रोल भरण्यासाठी निरंकारी पेट्रोल पंपावर वळण घेऊन जात असतांना जालन्याकडून बदनापूरकडं येणाऱ्या टॅक्टरनं दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की बाप लेकाचं शिर अक्षरशा: धडावेगळे झालं.
अपघातामुळं परिसरात हळहळ : परिसरातील नागरिकांनी अपघाताची माहिती बदनापूर पोलिसांना कळवली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या आणि जेसीबीच्या सहाय्यानं मृतदेह ट्रॅक्टर खालून काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बदनापूर इथं पाठवले आहेत. दरम्यान, या घटनेमुळं बदनापूर तालुक्यातील अकोला आणि निकळक या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान टॅक्टर चालक फरार झाला असून या टॅक्टरला बोर मशीन जोडलेली आहे व त्यावर नंबर नाही. सदरचं वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे यांनी दिली.
हेही वाचा :
- Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर
- Bihar Train Accident : 'अचानक धक्का बसला अन्...', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती, आतापर्यंत ४ ठार
- Train Accident Conspiracy Foiled: मोठी दुर्घटना टळली, रेल्वे रुळावर आढळले मोठं मोठे दगड