Jalna District Year Ender 2021 : रावसाहेब दानवेंना केंद्रात मंत्रीपदासह 'या' घटनांमुळे जालना जिल्हा वर्षभर चर्चेत
सरत्या 2021 वर्षात जालना जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. या घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील सामान्य माणसांचे आयुष्य टप्प्याटप्प्याने रुळावर आले हे सर्वांना मान्य करावे लागेल. यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांचा आकडा हजारोंच्या आकड्यावरून आता शून्यावर येऊ लागला आहे. दरम्यान, या वर्षभरात काय घडले याचा हा एक आढावा-
Jalna District Year Ender 2021 : रावसाहेब दानवेंना केंद्रात मंत्रीपदासह 'या' घटनांमुळे जालना जिल्हा वर्षभर चर्चेत
जालना - सरत्या 2021 वर्षात जालना जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. या घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील सामान्य माणसांचे आयुष्य टप्प्याटप्प्याने रुळावर आले हे सर्वांना मान्य करावे लागेल.यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांचा आकडा हजारोंच्या आकड्यावरून आता शून्यावर येऊ लागला आहे. दरम्यान, या वर्षभरात काय घडले याचा हा एक आढावा-
- ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणीजालना जिल्ह्यातील स्टील असोसिएशनने औद्योगिक वसाहतीमध्ये पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टची स्वखर्चाने उभारणी केली आणि गरजूंना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला. त्यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी स्टील असोसिएशनचा हा निर्णय मोठा आधार देणारा ठरला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून देखील जिल्ह्यातील हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यात देखील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती केली जात असून जालना जिल्ह्याचा ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न मिटलेला आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत जालना जिल्हा स्वयंपूर्ण झालेला आहे, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
- रावसाहेब दानवेंना केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीपद,जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरादेशाच्या राजकारणातही जालना जिल्ह्याला स्थान मिळाले. यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदी जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची वर्णी याच वर्षी लागली. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात महत्वाचे मंत्रिपद मिळाल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न रावसाहेब दानवे सोडवतील अशी अपेक्षा मराठवाड्यातील नागरिकांना आहे.
- विभागीय मनोरुग्णालयाला मंजुरी, जालन्यात होणार 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालयमहाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जालना शहरात प्रादेशिक मनोरुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयात 365 खाटा असणार आहेत. या रुग्णालयाला मंजुरी मिळवण्यात राज्याचे आरोग्य मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना यश आले आहे. आता जालना शहरात मराठवाड्यातील सर्वात मोठे मनोरुग्णालय उभे राहणार आहे. या रूग्णालयासाठी हिवाळी अधिवेशनात 59 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
- गुन्हेगारी वाढली, चोऱ्या, दरोडे, खून वाढलेजिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. सरत्या वर्षात चोऱ्या, दरोडे, खून, घरफोडयांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेवर दरोडा पडल्याने बीड आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातील पोलीस हादरून गेले होते. या वर्षातील सर्वात मोठा दरोडा शहागड येथील बुलढाणा बँक वर पडला. यामध्ये ९ लाख ५० हजार नगदी व ३ कोटी ४३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचा बीड पोलिसांनी दरोड्याचा तपास दोन दिवसात लावला. ठेवीदारांचे बँकेत ठेवलेले सोने आणि रोख रकमेसह दरोडेखोरांना पकडण्यात बीड पोलिसांना यश आले. शहरात आणि ग्रामीण भागात आता चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने जिल्हयातील नागरीक संतप्त आहेत.
- ईडीचे जिल्ह्यात धाडसत्रमाजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या अनुषंगाने सोमय्या यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. रामनगर साखर कारखान्यात अर्जुन खोतकर यांनी शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर काही दिवसांतच अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यांचे घर आणि खोतकर शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सलग 2 दिवस शहरात ईडीचे छापे पडले.
- खुनी विहीरजालना-चिखली रस्त्यावर जालना शहराजवळच असलेल्या जामवाडी या गावाजवळ हायवेला लागूनच असलेल्या विहिरीत सलग दोन दिवस दोन कार पडून अपघात झाले. यात एकूण पाच लोकांचा जीव गेला. या अपघातांची खूप चर्चा झाली. एकाच विहिरीत सलग दोन दिवस दोन कार पडणे ही मोठी विचित्र घटना होती. या घटनेनंतर पाच जणांचा बळी गेला. यात लहान मुलांचा देखील समावेश होता. या घटनेनंतर लगेचच या विहीरीची उंची वाढवून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या.
- वर्षभरात 30 लाचखोर चतुर्भुजलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सरत्या वर्षांत जिल्ह्यात एकूण 30 कारवाया झाल्या. या कारवायांमध्ये तीन बडे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले. यात जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, अप्पर जिल्हाधिकारी देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा समावेश होता. या तीन कारवायांमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चांगलाच चर्चेत राहिला आहे.
- विकास कामे जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरु होणार आहे. स्थानिक विकास कामे यात जुना जालना आणि नवीन जालना यांना जोडणारा लोखंडी पूलाचे काम पुर्ण झाले. रेल्वेच्या भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. वर्ष 2021 संपत असतानाच जालना नगरपालिकेचा देखील कार्यकाळ पूर्ण होत आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी सौ संगीता गोरंट्याल या जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असल्याने पालिकेच्या पुढील निवडणुकीसाठी शहरात विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटाच या सरत्यावर्षी लागलेला होता. यात जवळजवळ 300 कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये रस्ते, अंडरग्राउंड नाल्या, स्वच्छता या बाबींवर भर देण्यात आला. विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र नगरपालिकेत दिसून आले. केंद्रीय मंत्री दानवे यांनी नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष निधी नगरपालिकेस उपलब्ध करून दिला. यामुळे जालना शहरातील अंतर्गत रस्ते खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते विकासात आता शहराने चांगलीच भरारी घेतली आहे. उर्वरीत काही रस्तेही पूर्ण करावे अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
- ताजुद्दीन महाराजांचं निधन,जिल्ह्यावर शोककळाजालना जिल्ह्यातील प्रसिद्ध मुस्लिम कीर्तनकार ताजुद्दिन बाबा यांचे जळगाव येथे किर्तन सुरू असतानाच निधन झाले. ताजुद्दिन बाबा यांचा राज्यभरात खूप मोठा भक्त परिवार आहे. हिंदू -मुस्लिम ऐक्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. स्वतः मुस्लिम असून देखील त्यांची पांडुरंगावरील भक्ती कीर्तनाच्या माध्यमातून जाणवत राहिली. त्यामुळेच वारकरी संप्रदायात त्यांचे मोलाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाल्याची भावना वारकऱ्यांमध्ये निर्माण झाली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात त्यांचे वास्तव्य होते.
- माजी खासदार पुंडलीकराव दानवे यांचं निधनदोन वेळा जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिलेले माजी खासदार पुंडलीकराव दानवे यांचे यावर्षी वृद्धापकाळाने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह तीन मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.
Last Updated : Dec 30, 2021, 4:40 PM IST