जालना :जिल्ह्यामध्ये सिंचन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यापैकी काही घोटाळ्यांची प्राथमिक चौकशी झाली असून, आता नव्याने समोर आलेल्या आणखी काही घोटाळ्यांची चौकशी सचिव आणि आयुक्त हे दोघे मिळून ठराविक काळामध्ये पूर्ण करतील. या वरिष्ठांनी दिलेल्या अहवालानंतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
जालना जिल्ह्यात सिंचन घोटाळे; चौकशांना सुरुवात काय आहेत घोटाळे..
प्रधानमंत्री सिंचन योजना आणि नानाजी देशमुख सिंचन योजना या योजनेअंतर्गत केंद्राचा 60 टक्के वाटा आणि राज्याचा 40 टक्के वाटा असा एकूण शंभर टक्के लाभ शेतकऱ्यांना सिंचन योजनेसाठी दिला जातो. मात्र, हे लाभ देत असताना यामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामध्ये विशेषतः भोकरदन तालुक्यातील अनेक गैरव्यवहार आहेत. त्यातीलच एक गैरव्यवहार हिसोडा येथील आहे. याठिकाणी एकाच नावावर दोन सातबारा आणि एकाच नावावर दोन्ही योजना घेतल्याचे समोर आले आहे.
एकसमान अनेक प्रकरणे उघडकीस
हिसोडा येथील अनिता शेषराव बावस्कर यांच्या गट क्रमांक 347 मध्ये वेगवेगळ्या सातबारा दाखवून योजनेचा लाभ घेतला आहे. असे अनेक प्रकार समोर आले आहेत, या सर्व प्रकरणाची चौकशी सचिव आणि आयुक्त दोघे मिळून करणार आहेत. यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही ठिकाणी छायाचित्राच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. एकच फोटो संगणकाच्या साह्याने दोन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवून योजना हडप केल्या गेल्या आहेत. एवढेच नव्हे तर दोन शेतकऱ्यांच्या अशाही तक्रारी आल्या आहेत, की त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. मात्र, त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसेही जमा झाले आणि ते परस्पर उचललेही गेले आहेत.
अशा गंभीर प्रकरणांची चौकशी लवकरच सुरू होणार असून कोणत्याही अधिकाऱ्याला यामध्ये पाठीशी घातले जाणार नसल्याचेही कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर माजी आमदार संतोष सांबरे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा :'ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ग्राहकांची वीज बिल जमा करत बसावी'