मुंबई - गेल्यावर्षी वर्षी राजभवनच्या पायथ्याशी दुर्लक्षित अवस्थेत सापडलेल्या ब्रिटीशकालीन तोफा रविवारी (दि. २१) राजभवनातील हिरवळीवरून हलवून ‘जलविहार’ सभागृहासमोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. जवळजवळ पाच तासांच्या प्रयत्नानंतर प्रत्येकी २२ टन वजनाच्या या तोफा क्रेन्सच्या मदतीने उचलून जलविहार सभागृहाबाहेर दोन चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या.
राजभवनातील ऐतिहासिक तोफांची दर्शनी भागात प्रतिष्ठापना
गेल्यावर्षी वर्षी राजभवनच्या पायथ्याशी दुर्लक्षित अवस्थेत सापडलेल्या ब्रिटीशकालीन तोफा रविवारी (दि. २१) राजभवनातील हिरवळीवरून हलवून ‘जलविहार’ सभागृहासमोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. जवळजवळ पाच तासांच्या प्रयत्नानंतर प्रत्येकी २२ टन वजनाच्या या तोफा क्रेन्सच्या मदतीने उचलून जलविहार सभागृहाबाहेर दोन चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या.
‘जल विहार’ सभागृहात राज्यपाल विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत असतात. त्यामुळे या तोफा आता राज्यपालांना भेटायला येणाऱ्या देशी-विदेशी पाहुण्यांना तसेच राजभवनाला भेट देणाऱ्या नागरिकांना पाहता येणार आहेत. गेल्या वर्षी दिनांक ३ नोव्हेंबरला या दोन्ही तोफा राजभवनाच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून उचलून बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या जवळच असलेल्या हिरवळीवर तात्पुरत्या ठेवण्यात आल्या होत्या.
अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत पडल्या असल्यामुळे तोफा गंजलेल्या स्थितीत होत्या. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सुचनेनुसार तोफा जतन करण्यासाठी त्यांवर प्रक्रिया करण्यात आली व त्यावर गंजप्रतिबंधक मुलामा देण्यात आला. त्यानंतर तोफा ठेवण्यासाठी जलविहार सभागृहाबाहेर दोन चौथरे तयार करण्यात आले. या तोफांची लांबी ४.७ मीटर तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे. राजभवन येथे समुद्राच्या पायथ्याशी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना या तोफा मातीमध्ये दबलेल्या आढळल्या होत्या.