महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी सुरू - jalna fire audit

जालन्यातहीअग्निसुरक्षा परीक्षण (फायर सेफ्टी ऑडिट) करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा परीक्षणाचे काम करणार आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना किंवा त्या सक्षम यंत्रणेला देणार आहे.

अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी सुरू
अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी सुरू

By

Published : Feb 17, 2021, 7:23 AM IST

Updated : Feb 17, 2021, 7:47 AM IST

जालना -भंडारा येथे सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयांचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अग्नी सुरक्षा तपासणी (फायर सेफ्टीऑडिट) करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत करून हे फायरसेफ्टी ऑडिट सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी या समितीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निशमन व्यवस्थेची पाहणी केली.

रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी सुरू

भंडारामध्ये बाल रुग्णालयात आग लागून १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याच दृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्वच रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे जालन्यातही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी अग्निसुरक्षा परीक्षण (फायर सेफ्टी ऑडिट) करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा परीक्षणाचे काम करणार आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना किंवा त्या सक्षम यंत्रणेला देणार आहे.

ही आहे समिती-

अग्निसुरक्षा परीक्षण पथक समितीतील या पथकाचे प्रमुख म्हणून महानगरपालिका औरंगाबाद, येथील अग्निशमन विभागाचे प्रमुख मोहन मुंगसे, तसेच याच विभागातील प्रसाद शिंदे, जालना नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग जालना येथील कनिष्ठ अभियंता व्ही.ई. शेरकर, परतूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता महिंद्रकर, सामान्य रुग्णालयाचे लेखाधिकारी चंद्रकांत मुंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जालना चे वैद्यकीय पर्यवेक्षक एस. जे .मगर यांचा या पथकात समावेश आहे. या समितीने मंगळवारी सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची प्राथमिक पाहणी केली.

सर्वच शासकीय रुग्णालयांची होणार अग्नी सुरक्षा तपासणी-

जालना जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालय, अंबड येथील एक उपजिल्हा रुग्णालय सामान्य, रुग्णालयाच्या दोन्ही इमारती, शहरातील गांधी चमन परिसरातील स्त्री रुग्णालय, यांच्यासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अग्नी सुरक्षा तपासणी केली जाणार आहे.

Last Updated : Feb 17, 2021, 7:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details