जालना - जिल्ह्यात ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये हे प्रमाण वीस टक्के होते. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दूषित पाणीपुरवठा अंबड आणि परतूर तालुक्यात होत आहे. मागील महिन्यात 914 पैकी 187 ठिकाणचा पाणीपुरवठा दूषित आढळला आहे.
अंबड तालुक्यातील रुई गावाला गेल्या चार महिन्यांपासून सतत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात तक्रार करूनही कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावामतील ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिराच्या परीसर आणि बस स्थानक येथील पुरवठा केलेल्या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले असता, दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे पंचायत समिती कर्मचारी एस. एस. जाधव यांनी 28 ऑगस्टला केलेल्या पंचनाम्यात दिसून आले होते. असे असतानाही कुठलीही कारवाई झाली नाही.