जालना - राजस्थानी विशेष करून मारवाडी समाजात मिष्ठान्न पदार्थात प्रसिद्ध असलेल्या" घेवर" या पदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. विशेष करून संक्रांतीनिमित्त हा पदार्थ तयार केला जातो. नवीन जालना परिसरामध्ये रस्त्यावर दुकाने थाटून तयार करण्यात येणारा हा पदार्थ अनेकांच्या उपजिविकेचे साधन आहे.
घेवरचे महत्त्व
खरेतर घेवर हा राजस्थानमधील मिष्टान्नाचा एक प्रकार आहे. मारवाडी समाजात याला महत्त्व आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी लग्न सोहळे झाले आहेत असे वधूपिता संक्रांतीच्या निमित्ताने सासरी गेलेल्या मुलीकडे हा मिष्ठान्न पदार्थ पाठवतात. त्यासोबत फेण्या देखील पाठवल्या जातात. घेवर हा जालना जिल्ह्यातून तर फेण्या या बाहेरगावाहून मागवल्या जातात.
रस्त्याच्या कडेला थाटली दुकाने
रस्त्याच्या कडेला एक मंडप टाकून त्या मंडपात ही दुकाने थाटली जातात. गॅस शेगडी त्यावर उकळत राहणारे तेल, आणि वयस्कर कारागीर असे या घेवरच्या दुकानाचे चित्र असते. हळूहळू आणि काळजीपूर्वक हा पदार्थ तयार करावा लागतो. त्यामुळे नवीन पिढीतील तरुण सहसा या व्यवसायाकडे वळत नाहीत.
घेवर करण्यासाठी लागणारे साहित्य
मैद्यापासून घेवर हा पदार्थ तयार केला जातो. तुप आणि तेलात हे पीठ भिजवल्यानंतर थोडा रंग मिसळून उकळत्या तेलात चार विविध विभागात हे घेवर तयार होतात. एकाच वेळी चार घेवर तयार होतात, आणि हे करत असताना कढईत उकळत् असलेल्या तेलाचे तापमान देखील एक सारखे ठेवावे लागते. त्यासाठी कढईत तेल सारखे कमी जास्त करावे लागते. घेवरचा आकार बिघडू नये आणि ते व्यवस्थित निघावे यासाठी लिंबाचा देखील वापर केला जातो. मात्र याची आंबट चव घेवरला लागू नये याची देखील काळजी घेतली जाते. त्यानंतर हे घेवर पाकामध्ये मुरू दिले जातात, आणि थोड्यावेळाने वर काढून ठेवून त्यामधील पूर्ण पाक निघून गेल्यानंतर ते विक्रीसाठी, खाण्यासाठी तयार होतात. घेवर तयार करण्याच्या या पूर्ण प्रक्रियेला चार ते पाच घंटे लागतात.
तुपाचे दर वाढल्याने किमंतीमध्ये वाढ
दरवर्षी दीडशे ते दोनशे रुपये किलोने मिळणाऱ्या घेवरचा दर यावर्षी तेल आणि तुपाचा दर वाढल्यामुळे दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पाकामध्ये भिजवलेले म्हणजेच गोड घेवर दोनशे रुपये तर, ज्यांना मधुमेहा सारखे आजार आहेत, अशांसाठी पाकामध्ये न भिजवता केलेले घेवर तीनशे रुपये दराने विकले जात आहे. यावर्षी या पदार्थामध्ये आणखी एक नवी भर पडली आहे. ती म्हणजे चांगल्या तूपात तयार केलेले घेवर देखील उपलब्ध झाले आहेत. त्याचा दर सहाशे रुपय़ांपर्यंत आहे.
संक्रांतीनिमित्त 'घेवर'च्या मागणीत वाढ राजेंद्रप्रसाद मार्गावर थाटली घेवरची दुकाने
हा पदार्थ विशेषकरून मारवाडी समाजात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे मारवाडी समाज असलेल्या परिसरात याचे दुकाने आढळून येतात. त्यामुळे जालन्यातील बडी सडक अर्थात राजेंद्रप्रसाद मार्गावर अशा प्रकारची दुकाने थाटली गेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विनोद परदेशी आणि त्यांचे दोन सहकारी सुनील शर्मा गोपाल भुरेवाल हे या घेवरचा व्यवसाय करत आहेत.