जालना - एकाच दिवशी दोन शासकीय कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यापैकी एक पाटबंधारे विभागाचा कर्मचारी, तर दुसरा मंडलाधिकारी आहे.
हेही वाचा -वाहनाचा फोटो पाहून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
शेतीच्या क्षेत्र विभागणीसाठी लाच
अंबड तालुक्यातील डोणगाव शिवार येथे गट क्रमांक 33 मधील शेत जमिनीचा वाटणीपत्राच्या आधारे फेरफार झाला होता. या फेरफाराची विभागणी करून देण्यासाठी तक्रारदाराने २५ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय अंबड येथे अर्जही दिला होता. त्या अर्जानुसार अंबड तहसीलच्या जामखेड विभागाचे मंडल अधिकारी श्रीपाद गंगाधर मोताळे (वय 55) याला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने काल (26 फेब्रुवारी) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागितल्याची पडताळणी केली असता मोताळेला तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच पंचा समक्ष स्वीकारताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोरा येथे जय भद्रा किराणा स्टोअरच्या दुकानात सापळा रचला व तिथेच मोताळे यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी लाच
आपल्याच कार्यालयातील सहकाऱ्याची भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जालना येथील पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक महेश बाळकृष्ण रामदासी (वय 39) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणातील तक्रारदार हे अंबड येथे पाटबंधारे उपविभागात कार्यरत आहेत. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून रक्कम मंजूर करण्यासाठी त्यांनी मुख्य कार्यालयाकडे अर्ज केला होता. या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महेश रामदासी याने हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची केलेली मागणी 22 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पंचासमक्ष पडताळणी करून पाहिली. त्यामध्ये तथ्य आढळून आले. त्यानंतर काल सापळा रचण्यात आला. त्यानुसार दुपारी अंबड चौफुली परिसरात एका हॉटेलवर तीन हजार रुपयांची लाच घेताना महेश रामदासी याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. वरील दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा -जीएसटीतील जाचक अटींविरोधात व्यापाऱ्यांचा बंद; जालन्यात चांगला प्रतिसाद