जालना -एका कुटुंबाने आपली व्यक्ती समजून भलत्याच व्यक्तीचा अंत्यसंस्कार केला, त्यानंतर कुटुंबातील ती व्यक्ती घरी परतल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांनी कदीम जालना पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माहिती देताना जाधव कुटुंबीय आणि माजी नगरसेवक हेही वाचा -Jalna fruit seller murder : डबलजीन भागात २५ वर्षीय फळविक्रेत्याची हत्या ; शहरात खळबळ
जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा एका वाहनाच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच वेळी अडीच महिन्यापासून चंदणझिरा परिसरातील सुभाष प्रकाश जाधव नावाचा व्यक्ती हरवलेला होता. सुभाष जाधव आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वर्णन हुबेहूब जुळत असल्याने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी सुभाष जाधव यांच्या कुटुंबीयांना दिली.
जाधव यांच्या कुटुंबीयांनी देखील वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेला व्यक्ती हा सुभाष जाधवच असल्याची माहिती पोलिसांना दिली. वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. कुटुंबीय आणि नातवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, या अंत्यविधीनंतर आज नऊ दिवसांनंतर चक्क सुभाष जाधव घरी परत आल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक आवाक झालेत. सुभाष जाधव जिवंत असून आपण दुसऱ्याच अज्ञात व्यक्तीचा अंत्यविधी केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी घटनेची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली. या संपूर्ण घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, सुभाष जाधव जिवंत घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा -Third Wave of Corona : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झाली सुरुवात - आरोग्यमंत्री टोपे