जालना- भारत माता स्वतंत्र झाली, त्यावेळी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान केले असते तर आज देश अखंड राहिला असता, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगावकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त जालन्यात साळेगावकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते." सावरकर आक्षेप व खंडन" या विषयावर त्यांनी व्याख्यान केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून हरिभक्त परायण भगवान बाबा आनंदगडकर, प्रमुख पाहुणे देवगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजू भालेराव, बाल रोग तज्ञ उमेश करवा, आणि सावरकर जयंती समितीचे अध्यक्ष जगदिष गौड यांची उपस्थिती होती.
सावरकरांवर होत असलेल्या आरोपाचे खंडन करताना साळेगावकर महाराज म्हणाले की, ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी आंबेडकरांच्या सचिवांनी एक लेख लिहिला आहे. तो लेख आजही वाचण्यासाठी उपलब्ध आहे. या लेखामध्ये ते म्हणतात "जीना ,गांधीजी, आंबेडकर, यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये गांधीजींनी जीनांना तुम्ही पाकिस्तान का मागता? असा प्रश्न केला. त्यावेळी जिना म्हणाले की तुम्ही नेहरूंना पंतप्रधान करू नका मी पाकिस्तान मागत नाही. मात्र, गांधीजींनी उलट उत्तर देऊन मग तुम्हाला पंतप्रधान करायचे का? असा प्रतिप्रश्न जीनांना केला. याच वेळी जीना म्हणाले की मलाही करू नका डॉक्टर आंबेडकर यांना पंतप्रधान करा."
डॉ. आंबेडकर पंतप्रधान झाले असते तर देश अखंड राहिला असता - साळेगावकर जर त्यावेळी डॉक्टर आंबेडकर यांना पंतप्रधान केले असते तर, आज देश अखंडित राहिला असता. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नेहरूवरील प्रेम आंधळे झाले होते .या आंधळ्या प्रेमापायी आपण देखील नेहरूंना चाचा नेहरू म्हणत आणि त्यांना आवडणाऱ्या फुलांचे गुणगान गात मात्र अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चाचा नेहरूंना मुलांच्या निमित्ताने जवळ आलेल्या मुलांच्या आई आवडायच्या आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोपही साळेगावकर यांनी केला. सावरकर हे कधीही जातीयवादी नव्हते, इतर जाती धर्मासाठी जो झटतो तोच खरा देशभक्त, असे ते सांगत होते असेही ते म्हणाले.
दरम्यान राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगावकर यांच्यावर जाहीर भाषणाला बंदी घातली होती. ती उठवताच त्यांनी पुन्हा कीर्तनाच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृतीचे काम सुरू केले आहे. हिंदूमहासभेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 डिसेंबर 2014 रोजी परभणी येथे हिंदू महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्यावर भाषणाला बंदी होती. या कार्यक्रमाच्या आठ दिवसांपूर्वीच ओवेसी यांची औरंगाबाद येथे सभा झाली. या सभेमध्ये ओबीसींनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाला उत्तर देण्याचे काम साळेगावकर यांच्यावर आले होते. ओवेसी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे उत्तरही साळेगावकर यांनी वादग्रस्त विधानानेच दिल्यामुळे त्यांच्यावर भाषणाला बंदी आली होती. मागील वर्षी ही बंदी उठविल्यानंतर साळेगावकर यांनी पुन्हा भाषणे देणे आणि व्याख्याने भाषण देणे याला सुरुवात केली.