जालना -शहरातील मामा चौक परिसरात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दख्खन प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हे प्रदर्शन नागरिकांना पाहावयास मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीची शस्त्रास्त्रे होती याचा अंदाज इथे येतो.
जालन्यात दख्खन प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये युद्धात वापरण्यात आलेल्या लहान-मोठ्या तलवारी, गुप्ती, धनुष्यबाण, भाला, गदा, माडु म्हणजे हाताच्या मुठीमध्ये धरण्याचे एक शस्त्र आदि ठेवण्यात आली आहेत. माडु हे शस्त्र समोरच्या भागाला सुईच्या टोकाप्रमाणे असते आणि या भागाला विष लावलेले असते. त्यामुळे एखाद्यावर वार करायचा असेल तर सहज चालता चालता मुठीत धरलेले हे शस्त्र शत्रुच्या शरीरात खुपसायचे, जेणेकरून त्यातील विष हे त्याच्या शरीरात भिनले जाईल. त्यासोबत वाघनखे देखील इथे पाहावयास मिळतात. सामान्य माणसाला वाघनखे म्हणजे वाघाची नखे असेच अपेक्षित असते. मात्र हे वाघांच्या नखाप्रमाणे धारदार असून हाताच्या बोटामध्ये घालावयाचे शस्त्र आहे. झाडावर, किल्ल्यांवर चढण्यासाठी तसेच छुपे शास्त्र म्हणूनही याचा वापर केला जातो. या वाघ नखांच्या मदतीनेच छत्रपतींनी अफजलखानाचा वध केला होता.
यासोबत ज्या चिलखतांमुळे छत्रपतींचा जीव वाचला ते चिलखत कशा पद्धतीचे होते हे देखील येथे पाहावयास मिळते. आपण आपल्या गळ्यातील लॉकेटमधील प्रत्येक कडी जशी गुंफलेली असते, तशाच पद्धतीने हे चिलखत गुंफल्या जाते. लोखंडी तारांमध्ये गुंफून हे अंगात घातल्यामुळे तलवारीचा वार शरीरावर होत नाही आणि जखमही होत नाही. अशी अनेक प्रकारची शस्त्रे या प्रदर्शनात पाहायला ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहलाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे येथे सापडतात.