महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हेलेंनटाईन डे : प्रेमी युगुलांवर हिंदू महासभेची राहणार करडी नजर; खऱ्या प्रेमविरांचे लावणार लग्न - हिंदू महासभा

यासंदर्भात बोलताना धनसिंग सूर्यवंशी ठाकूर म्हणाले की, आमचा प्रेम करणाऱ्यांना विरोध नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी बसून नवीन पिढी आणि वयोवृद्धांना खाली माना घालायला लावणाऱ्या हावभावांमुळे आम्ही याला विरोध करीत आहोत. शिवाय खरे प्रेम करणारे प्रेमी युगुल असेल तर त्यांचा विवाह देखील लावून देण्याची तयारी आहे.

हिंदू महासभेचे कार्यकर्ते

By

Published : Feb 13, 2019, 11:34 PM IST

जालना - व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमी युगुलांवर हिंदू महासभा आणि महाराणा प्रताप ब्रिगेडचे कार्यकर्ते करडी नजर ठेवणार आहेत. यावेळी अनुचित प्रकार दिसल्यास तो उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे खरे प्रेम करणाऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या संमतीने या युगुलाचा विवाह देखील लावून देण्याची तयारी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

१४ फेब्रुवारी हा तरुण पिढीसाठी आनंदाचा दिवस असतो. 'तेरे लिये जान भी हाजीर है, तुझ्यासाठी काय पण?, तू फक्त सांग' अशा अनेक आणाभाका आणि मित्र-मैत्रिणींच्या मागण्या मंजूर केल्या जातात.

विशेष करून महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये या दिवसाचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे भेटवस्तू देण्यापासून ते फिरायला जाण्यापर्यंतचे नियोजन या मंडळींनी करून ठेवले आहे. मात्र, हे सर्व अनुकरण पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आहे आणि याचा लहान मुलांमुलींवर, नवीन पिढीवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे हा प्रकार करू नये यासाठी हिंदुमहासभेचे आणि महाराणा प्रताप ब्रिगेडचे सुमारे ७० कार्यकर्ते उद्या शहरातील विविध महाविद्यालयांवर आणि एकांताच्या ठिकाणी करडी नजर ठेवणार आहेत.

यासंदर्भात बोलताना धनसिंग सूर्यवंशी ठाकूर म्हणाले की, आमचा प्रेम करणाऱ्यांना विरोध नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी बसून नवीन पिढी आणि वयोवृद्धांना खाली माना घालायला लावणाऱ्या हावभावांमुळे आम्ही याला विरोध करीत आहोत. शिवाय खरे प्रेम करणारे प्रेमी युगुल असेल तर त्यांचा विवाह देखील लावून देण्याची तयारी आहे. त्‍यासाठी या युगुलाच्या संमतीने दोन्ही परिवारासोबत संपर्क साधून आणि कायद्याच्या चौकटीत बसवून हा विवाह लावून देऊ. मात्र, सार्वजनिक ठिकाणी या पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्यांचा डाव आम्ही उधळून लावल्या शिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशाराही सूर्यवंशी यांनी दिला.

जालना शहरातील चौपाटीचे ठिकाण म्हणजे मोती तलाव आहे. तसेच हा तलाव शहराच्या बाहेर आणि महाविद्यालयांपासून जवळच आहे. त्यासोबतच तलावाच्या बाजूलाच मोतीबाग देखील आहे. त्यामुळे या परिसरात उद्या प्रेमीयुगुलांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दरम्यान तलावाभोवती असलेले थंड वातावरण आणि शांतता तसेच शहराच्या बाहेर मात्र जाण्यायेण्यास आणि बसण्यास सोपे असलेल्या या ठिकाणी नेहमीच तरुण-तरुणींची वर्दळ असते. महाविद्यालयातील तरुण आणि तरुणी या ठिकाणी बराच वेळ विरंगुळा करतात. त्यामुळे या ठिकाणाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details