जालना - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. अंबड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे घरांमध्ये तसेच दुकानामध्ये पाणी शिरले आहे. भोकरदन शहरातील केळणा नदीला पूर आला आहे. तसेच बुलडाणा-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत असून, वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.
पावसाची जोरदार हजेरी, जनजीवन विस्कळीत अंबड तालुक्यातील डावरगाव आणि सुखापुरी लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने संगमेश्वर नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे अंबड तिर्थपुरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत होईल असा अंदाज आहे. या महापुराचे पाणी सुखापुरी गावातील झोपडपट्टीत शिरले आहे. तसेच बसस्टॉप परिसरात पावसामुळे खत, किराणा सामान आणि कापड दुकानदारांचे लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे पिठोरी शिरसगाव, घुंगर्डे हादगावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबडमधील वडीगोद्री परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे घरेही जलमय झाली आहेत.
हेही वाचा -मराठवाड्यात सर्वदूर पाऊस बरसला, नदी-नाले झाले तुडुंब झाल्याने जनजीवन विस्कळीत
133 मिमी पावसाची नोंद
भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगाव येथे पावसामुळे गावातील नदीला पूर आला आहे. गावातील दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. अंबडमधील वडीगोद्री महसूल मंडळात 133 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नुकतीच लागवड केलेल्या ऊस,मोसंबी पिकांत पाणी साचले आहे.
मोटारसायकल गेली वाहून
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव तिर्थपुरी रोडवरील कोहली नाल्यात एका तरुणाची मोटारसायकल वाहून गेली आहे.सुदैवाने दुचाकीस्वार मात्र वाचला आहे. अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आला आहे. नाल्याला पूर आलेला असतानाही या तरुणाने पुराच्या पाण्यातून दुचाकी टाकली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली.
हेही वाचा -Jalyukt Shivar : तत्कालीन फडणवीस सरकारच्या 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू