जालना -सध्या राज्यात 9 हजार कोरोना रुग्ण असून आधी तिसऱ्या लाटेतील कोरोनाबाधितांची दररोजची संख्या ही 48 हजारापर्यंत होती. आता आकडा अधिकच खाली आलेला आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून, आता चिंतेचा विषय नक्कीच नाही. त्यामुळे, ही तिसरी लाट संपली, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही वाचा -Maratha Reservation Demand : मराठा महासंघाच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण; छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला दिले समर्थन
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परिणाम भोगले, त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे, अशी भूमिका घेऊन चालणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले. सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करत आहोत, मात्र मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाईगडबड चालणार नाही, हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील नागरिकांना सरसकट बूस्टर डोस देण्यात यावा, अशी कोणतीही मागणी राज्याच्या टास्क फोर्सने केलेली नाही. बूस्टर डोस नागरिकांना देण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याप्रमाणे नागरिकांना बूस्टर डोस दिला जाईल, असेही टोपे म्हणाले.
मुंबईत कोरोनावरील दीड लाख डोसची एक्सपायरी डेट जवळ आल्याने आरोग्य विभागासमोर हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर त्या बाबतचा निर्णय घेतला जाईल, असे देखील टोपे म्हणाले. जालन्यातील पल्स पोलिओ लसीकरण कार्याक्रमाला यायला इतर कार्यक्रमामुळे उशीर झाला असला तरी, लसीकरण सकाळीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असेही टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा -तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड, रूम देण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश - राजेश टोपे