जालना - समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात शिव भोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंबकल्याण मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात शिवभोजन थाळीला सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री टोपे यांनी स्वत: या भोजनाची चव चाखली.
जालन्याचे पालकमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना
शिवभोजन थाळीमध्ये दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात असे पदार्थ दहा रुपयात उपलब्ध करून देण्यात आले. जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा रुगणालय आणि महिला रुग्णालयाच्या परिसरात हे शिवभोजन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या ताटा मागे शहरी भागामध्ये 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये कंत्राटदारांना देणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिन विशेष : येथे महात्मा गांधींच्या नावाने भरते यात्रा, यंदा ६७ वे वर्ष
या भोजनालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक गरजू आणि गरीब व्यक्तीला चांगली सेवा देण्यात यावी. अन्नाचा दर्जा उत्तम ठेवण्याबरोबरच या ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री टोपे यांनी भोजनालयातील कर्मचाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्यै, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड हेही या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर होते.
हेही वाचा - मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला, मला मुंबईच्या प्रश्नांची जाण - मुख्यमंत्री
त्यापूर्वी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि अन्य विभागांतील अधिकाऱ्यांचा राजेश टोपे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांचे दोन लाखांच्यावर कर्ज थकीत असले तरी उर्वरित रक्कम भरून दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा नवीन निर्णय लवकरच घेण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलेले आहे, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन कर्ज देण्याचा निर्णय लवकरच येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.