जालना - शहरातील नामांकित रुग्णालये रुग्णांकडून सक्तीने फी वसूल करत आहेत. तसेच रुग्णांवर उपचार करत असताना परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्यामुळे जालन्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून त्याचे खापर शासनावर फुटत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, शहरात जी नामांकित रुग्णालये आहेत. त्या सर्व रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत 977 आजार येतात. त्यामुळे कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत पैसे मागू नये. अथवा ॲडव्हान्स देखील मागू नये. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर सदर रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (सोमवार) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथे सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टर यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, जालन्यातील लॉकडाऊन आणि आरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयांबाबत भाष्य केले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत... हेही वाचा -'...म्हणून शिवसेनेने घेतली शरद पवारांची मुलाखत '
दरम्यान, आतापर्यंत आय.एम.ए. च्या (इंडियन मेडिकल असोसिएशन) डॉक्टरांकडून कोरोनासाठी आरोग्य सेवा-सुविधा घेण्यात येत नव्हती. मात्र, आता शहरातील नामांकित डॉक्टरांना सामान्य रुग्णालयात सात दिवस सेवा देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचनाही आज झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. सध्या ज्या ठिकाणी सामान्य रुग्णालय आहे, त्या रुग्णालयांमध्ये फक्त पंचवीस रुग्ण भरती आहेत. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोविड-19 रुग्णालयात असलेले 125 बेड्स पूर्ण भरले आहेत. या ठिकाणी कोविडचे सर्व रुग्ण एकत्र असावेत, असे अपेक्षित आहे. जेणेकरून या सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळेल. म्हणून सध्या असलेल्या सामान्य रुग्णालयातील पंचवीस रुग्णांना गांधीचमन येथे असलेल्या जुन्या स्त्री रुग्णालयांमध्ये नेण्यात येणार आहे. त्यामुळे हे सामान्य रुग्णालय आणि नवीन बांधलेले कोविड-19 चे रुग्णालय पूर्णपणे कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -राज्यात आज साडेसहा हजार नव्या रुग्णांची भर, १९३ जणांचा मृत्यू
मागील आठ दिवसांपासून जालना शहरात संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदीचा काय परिणाम झाला? याविषयी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ही संचार बंदी उपयोगाची ठरते. त्यामुळे निश्चितच कोरोनाचा प्रसार रोखला जाऊ शकतो. या सोबतच लॉकडाऊनच्या काळात हॉस्पिटलमध्ये असलेल्या बेड्सची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि कदाचित पुन्हा नवे रुग्ण वाढतील. त्यामुळे सध्या असलेल्या रूग्णांवर योग्य उपचार करून त्यांना घरी सोडून नवीन रुग्णांसाठी पूर्वतयारी करण्यासाठी देखील हे लॉकडाऊन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या लॉकडाऊनचा निश्चितच फायदा झाला आहे.